विद्यार्थ्यांना शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनावर आधारित ग्रंथांचे वाटप
महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचा अनोखा उपक्रम

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १२ एप्रिल २०२५ :- महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. हे पुरोगामी विचारांचे राज्य उभारणीत प्राथमिक शिक्षण व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, मुलींच्या शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजते आवश्यक आहे. याच हेतूने या महापुरुषांचे विचार व कार्य विद्यार्थ्यांना समजावे आणि या विचारांचा उपयोग भावी आयुष्य घडण्यासाठी व्हावा,या उद्देशाने पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना या महापुरुषांच्या जीवनावर आधारित ग्रंथांचे वाटप करण्यात आले.
यानुसार नाना पेठेतील डीसीएम सोसायटी या संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर , माता रमाई आंबेडकर आदींच्या जीवनावर आधारित ग्रंथ भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
महापुरुषांची जयंती ही नाचून नव्हे तर, वाचून साजरी झाली पाहिजे. जेणेकरून त्यातून विद्यार्थ्यांचे मन परिवर्तन होऊन ते चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतील आणि जीवनात यश प्राप्त करतील, हा यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी इंजिनियर्स व काँट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र भोसले यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी अमोल राजगुरू, उदय साळवे, भालचंद्र हुलसुरे,बिपिन दंताळ,दिग्विजय निंबाळकर, तुषार पुस्तके आणि संस्थेचे पदाधिकारी विशाल शेवाळे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.