GramPanchayat property information is now online :- ग्रामपंचायत मालमत्तांची माहिती आता ऑनलाईन!

ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम : जिल्ह्यातील ९४७७ मालमत्तांचे सर्वेक्षण व डिजिटल नोंदणी

GramPanchayat property information is now online :- ग्रामपंचायत मालमत्तांची माहिती आता ऑनलाईन!
ठाणे:- ठाणे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींच्या मालमत्तांची सुरू केलेली ऑनलाईन नोंदणी.

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २२ जून २०२५ :-  ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मालमत्तांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम ठाणे जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या मालमत्तांचे सर्वेक्षण व डिजिटल नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या मिळून एकूण ९ हजार ४७७ स्थावर व जंगम मालमत्तांच्या नोंदी ऑनलाइन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडील इमारती, त्याभोवतालची मोकळी जागा, खुले भूखंड, इमारतीविना असलेल्या जमिनी आणि जंगम मालमत्तांचे सर्वेक्षणासाठी ऑनलाईन नोंद संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही माहिती अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मालमत्तेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ ग्रामपंचायतींसाठी संपत्ती व्यवस्थापनाचे पारदर्शक व युनिक साधन ठरणार आहे.

ग्रामपंचायतींच्या मालमत्तांची अचूक माहिती ही स्थानिक प्रशासनाच्या पारदर्शकतेची गुरुकिल्ली आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्यात समन्वय व पारदर्शक कार्यपद्धती निर्माण होईल. ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदीसाठीच नव्हे, तर मालमत्तेचे संरक्षण, नियोजन, सुविधा उपलब्धता, देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठीसुद्धा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. ‘डिजिटल ग्रामशासन’ या संकल्पनेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व पारदर्शक बनविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल.

- रोहन घुगे,  मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद ठाणे.