Ex minister Madam Bafna's funeral : माजी मंत्री मदन बाफना यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी वडगाव मावळमध्ये होणार अंत्यसंस्कार! 

मदन बाफना यांचे सोमवारी पुण्यात निधन,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वांपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात : पुढे राज्य मंत्रिमंडळात सांभाळली विविध खात्यांची जबाबदारी 

Ex minister Madam Bafna's funeral : माजी मंत्री मदन बाफना यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी वडगाव मावळमध्ये होणार अंत्यसंस्कार! 
पुणे:- माजी राज्यमंत्री मदन बाफना

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ सप्टेंबर  २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ विधानसभेचे सलग १० वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड.मदन हरकचंदजी बाफना यांचे सोमवारी (दि.१४ सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.१५ सप्टेंबर) दुपारी चार वाजता वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा, चार मुली, पाच भाऊ, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. बाफना यांनी पुणे जिल्ह्याच्या, विशेषतः मावळच्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुणे जिल्हा परिषदेच्या उपलब्ध अधिकृत नोंदीनुसार त्यांनी १९७९ मध्ये जिल्हा परिषद सदस्य राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विधानसभा राजकारणात प्रवेश केला. ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच सन १९८५ मध्ये पहिल्यांदा कॉंग्रेसच्या उमेदवारीवर मावळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर सन १९९० मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. या सलग दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी आमदार म्हणून मावळचे प्रतिनिधित्व केले.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली. सन १९८७ ते १९९२ या कालावधीत त्यांनी महसूल, विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. प्रशासन, कायदा आणि महसूल विषयांशी संबंधित कामकाजात त्यांनी योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणूनही ते ओळखले जात असत‌. पुढील काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना बाफना यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे मावळ परिसरात त्यांचा स्वतंत्र राजकीय आणि सामाजिक संपर्क निर्माण झाला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी दुःख व्यक्त केले.

मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार 

दरम्यान, मदन  बाफना यांचे पार्थिव मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) सकाळी ७ ते ९ या वेळेत बाणेर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत वडगाव मावळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. उद्या दुपारी ४ वाजता वडगाव मावळ येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेस प्रारंभ होऊन वडगाव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

उद्या सकाळी ८.३० वाजता अंत्यदर्शन घेणार 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या (मंगळवारी) सकाळी ८.३० वाजता मदन बाफना यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. यासाठी शरद पवार हे बाफना यांच्या बाणेर येथील निवासस्थानी जाणार आहेत.