Pune PF office Bifurcation : पुणे येथील ‘पीएफ’च्या कार्यालयाचे विभाजन केवळ कागदोपत्रीच, तब्बल तीन वर्षांपासून तीनही कार्यालयांचा कारभार चालतो एकाच इमारतीतून!
अपुऱ्या जागेमुळे निवृत्तीवेतनधारक, कर्मचारी आणि नियोक्ता आस्थापनांची होतेय मोठी गैरसोय
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२६ :- पुणे शहरातील निवृत्तीवेतनधारक व भविष्य निर्वाह निधीचा (PF) लाभ घेणाऱ्या सदस्यांची संख्या वाढत असल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पुणे येथील विभागीय कार्यालयावरील कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या कार्यालयावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी व वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या इमारतीतील विभागीय कार्यालयाचे विभाजन करून विमाननगर येथे अतिरिक्त प्रादेशिक कार्यालयाची स्थापना केली. मात्र, हे विभाजन केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे दिसून येत आहे.
भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) विभागीय कार्यालयाचे विभाजन होऊन तीन स्वतंत्र कार्यालये अस्तित्वात आली आहेत. परंतू,या तीनही कार्यालयांचा कारभार आजही एकाच इमारतीतून सुरू आहे. परिणामी, या कार्यालयांसाठी एकच इमारत अपुरी पडत असून तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी आणि जागेची कमतरता निर्माण झाली आहे. अपुऱ्या जागेमुळे निवृत्तीवेतनधारक, भविष्य निर्वाह निधी सदस्य, कर्मचारी तसेच नियोक्ता आस्थापनांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे (झोनल ऑफीस) विभाजन करून अन्य दोन स्वतंत्र प्रादेशिक कार्यालये निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये कँटोन्मेंट पुणे आणि विमाननगर अशा दोन प्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. सध्या ही तीनही कार्यालये पुण्यातील पुलगेट पीएमपी बसस्थानकाजवळील गोळीबार मैदान येथील पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या इमारतीत कार्यरत आहेत.
केंद्र सरकारने दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यातील विद्यमान विभागीय कार्यालयाचे विभाजन करून विमाननगर येथे अतिरिक्त प्रादेशिक कार्यालयाची स्थापना केली आहे. या पुनर्रचनेनंतर सर्व संबंधित कार्यालयांनी आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्रपणे कार्यरत होणे अपेक्षित होते. तरंच विभाजनाचा खरा उद्देश साध्य झाला असता आणि भविष्य निर्वाह निधी सदस्य, वर्गणीदार, निवृत्ती- वेतनधारक व नियोक्ता आस्थापनांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असता, असे मत अपुऱ्या सुविधांच्या त्रस्त झालेल्या वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांनी व्यक्त केले आहे.
विमाननगर येथील कार्यालयाने विमाननगर किंवा खराडी, नगर रोड, हडपसर औद्योगिक वसाहत आणि हडपसर परीसरात कार्यरत होणे अपेक्षित होते. मात्र, जवळपास तीन वर्षे उलटूनही ही कार्यवाही झालेली नाही. प्रत्यक्षात, नव्याने स्थापन करण्यात आलेले विमाननगर येथील प्रादेशिक कार्यालय हे गेल्या तीन वर्षांपासून गोळीबार मैदान येथील मूळ विभागीय कार्यालयाच्या इमारतीतच कार्यरत आहे.
पुण्यातील एकाच ठिकाणी कार्यरत असलेली कार्यालये
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, विभागीय कार्यालय, पुणे झोन, गोळीबार मैदान, पुणे.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, प्रादेशिक कार्यालय, पुणे कँटोन्मेंट, पुणे.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, प्रादेशिक कार्यालय, विमाननगर, पुणे.
‘पीएफ’ कार्यालये एका दृष्टीक्षेपात...
- पुणे शहरातील एकूण कार्यालये --- ०४.
- सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकारी --- ८४.
- या कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी --- ४२४.
- अन्य कर्मचारी/स्टाफ --- १९४.
- या कार्यालयांशी संलग्न आस्थापना --- २४,०७३.
- एकूण सहभागी सदस्य --- २४,२७,९६७.
