Honoring meritorious students from BAI : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप! 

बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे केंद्रातर्फे सन्मान : शिक्षणासाठी मेहनत आणि जिद्द आवश्यक असल्याचे मान्यवरांचे मत 

Honoring meritorious students from BAI : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप! 
पुणे:- बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे सेंटरच्या वतीने सत्कार करण्यात आलेले गुणवंत विद्यार्थी, प्रमुख पाहुणे आणि असोसिएशनचे पदाधिकारी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ ऑक्टोबर २०२६ :- आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांच्या पाठीवर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (BAI) पुणे केंद्राच्या वतीने शाबासकीची थाप देण्यात आली. यासाठी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यात आल्या. 

या कार्यक्रमाला पुण्याचे सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय पवार, अजयश्री सोशल फाऊंडेशनचे संचालक अजयकुमार लोळगे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव डॉ. महेश राठी आणि कोषाध्यक्ष सुशील अग्रवाल आदी उपस्थित होते. 

या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यामध्ये शैक्षणिक मदत, सामाजिक सुरक्षा, मातृत्व लाभ आणि निवृत्तीवेतन योजनांचा समावेश असून याचा लाभ घेण्यासाठी  पात्र बांधकाम कामगारांनी संबंधित मंडळाकडे नोंदणी करावी,असे आवाहन त्यांनी केले. यश मिळविण्यासाठी कष्ट आणि शिक्षणाला पर्याय नसल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत करण्याचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि इंटर्नशिपच्या संधी

अजयश्री सोशल फाऊंडेशनचे संचालक अजयकुमार लोळगे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन, शैक्षणिक सहकार्य आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळविलेले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता समाजाच्या विकासासाठीही करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष अजय गुजर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे आणि मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजातील विविध संस्था आणि घटकांनी उभे राहणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.

या कार्यक्रमाला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत मोरे, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष जगन्नाथ जाधव, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, रयत शिक्षण संस्थेच्या पुणे विभागाच्या सदस्य तथा निसर्ग ऋण फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सोनावणे आदींसह  बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे केंद्राचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणे आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश ठरला.