NEET exam result 2026 : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षक दांपत्य कन्या श्रावणी कुदळेची 'नीट' (NEET) परीक्षेत गरूडझेप!
देशात मुलींमध्ये प्रथम, एकूणात देशातून पाचवा तर, महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला : चोरमले वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ जुलै २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षक दांपत्य कन्या श्रावणी कुदळे हिने 'नीट' (NEET) परीक्षेत गरूडझेप घेतली आहे. कुदळे हिने या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम, एकूणात देशात पाचवा तर, महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रावणी ही दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशामुळे दौंड तालुक्याच्या आणि पुणे जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दौंड तालुक्यातील चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ती माजी विद्यार्थिनी आहे. चोरमले वस्ती ही जिल्हा परिषद शाळा झेडपी अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या मतदारसंघात आहे. श्रावणी कुदळे हिच्या या यशामुळे जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर विद्यार्थी देशपातळीवर उत्तुंग यश संपादन करू शकतात, याचा प्रेरणादायी प्रत्यय आला आहे.
सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या देशपातळीवरील 'नीट' (NEET) परीक्षेत श्रावणी कुदळे हिने एकूण ७२० पैकी ७१० गुण मिळाले आहेत. पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असल्याची भावना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. श्रावणीने चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने शारदानगर येथील माध्यमिक शाळेत पुढील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षणातून घडलेल्या श्रावणीने पुढे आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्य, कठोर परिश्रम आणि ध्येयावर केंद्रित अभ्यासाच्या बळावर देशातील अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेत हे दैदिप्यमान यश संपादन केले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची पायाभरणी झालेला विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च यश मिळवू शकतो, हे श्रावणीने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
दौंड तालुक्यातील श्रावणी कुदळे हिच्या या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यशाबद्दल तिचे, तिचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
- वीरधवल जगदाळे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे. चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी झालेल्या श्रावणी कुदळे हिने 'नीट' ( NEET) परीक्षेत मिळविलेले देशपातळीवरील यश हे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या यशाचा पुणे जिल्हा परिषदेला अभिमान आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
जिल्हा परिषद शाळेतून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास देशपातळीवरील सर्वोच यशापर्यंत पोहोचू शकतो, याचे श्रावणी कुदळे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस तसेच भावी डॉक्टर म्हणून देशसेवा करण्याच्या तिच्या स्वप्नास पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा.
- विवेक वळसे पाटील,
उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती, जिल्हा परिषद, पुणे.
