Pune ZP's ‘Dnyan Setu’ Initiative : माझे गाव ते माझा देश, राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुणे जिल्हा परिषदेचा ‘ज्ञान सेतू’!
पुणे झेडपीच्या शाळांतील ५१ गुणवंत विद्यार्थी आणि ९ शिक्षकांचा जम्मू-काश्मीर, आसाम व अरुणाचल प्रदेशचा शैक्षणिक दौरा : शालेय सहअध्ययन व प्रादेशिक अभ्यास करणार
डॉ. गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ नोव्हेंबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे विश्व हे केवळ गाव, तालुका आणि जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना संपूर्ण देशाची ओळख व्हावी, विविध भाषा, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा आणि शालेय जीवनापासूनच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने ‘माझे गाव ते माझा देश’ हा अभिनव विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘ज्ञान सेतू’असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत झेडपी शाळांमधील ५१ गुणवंत विद्यार्थी आणि ९ शिक्षक जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या शैक्षणिक दौऱ्यावर मंगळवारी (दि.१७ नोव्हेंबर) गेले आहेत. रेल्वेने पुण्यातून प्रस्थान करणारा हे विद्यार्थी येत्या दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात परतणार आहेत.
शिक्षण केवळ पाठ्यपुस्तके आणि वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांचे ज्ञानविश्व समृद्ध करण्याचा, या उपक्रमाचा प्रयत्न आहे. भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधता अनुभवण्याबरोबरच अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, तेथील शैक्षणिक पद्धती समजून घेणे आणि ‘विविधतेत एकता’ या भारतीय मूल्याची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
प्रवासातूनही भारत दर्शन
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी रेल्वे प्रवासालाही शिक्षणाचा भाग बनविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून देशाच्या ईशान्य आणि उत्तरेकडील भागाकडे जाताना बदलते भौगोलिक स्वरूप, निसर्ग, लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि प्रादेशिक परंपरा अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रत्यक्ष प्रवासातून देशाच्या विविधतेची ओळख करून देण्याची संकल्पना या उपक्रमात मांडण्यात आली आहे.
नऊ गट, नऊ यजमान शाळा
या उपक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नऊ गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटासाठी एक यजमान शाळा निश्चित करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील भद्रा आणि पुंछ, आसाममधील दिराक, काकोपठार आणि दिब्रूगड, तसेच अरुणाचल प्रदेशातील रोइंग आणि तेजू येथील शाळांमध्ये या विद्यार्थ्यांचे यजमानत्व केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवासापूर्वी दोन दिवसांचे पूर्वतयारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सांस्कृतिक संवेदनशीलता, संवाद कौशल्ये, संबंधित प्रदेशांची भौगोलिक व सांस्कृतिक माहिती आणि भेटीदरम्यान अपेक्षित अनुभव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पाच दिवस शाळेत सहअध्ययन, दोन दिवस प्रादेशिक अभ्यासदौरा
या शैक्षणिक उपक्रमात पाच दिवसांचे शालेय सहअध्ययन आणि दोन दिवसांचा प्रादेशिक अभ्यासदौरा असे नियोजन करण्यात आले आहे. शालेय सहअध्ययनाच्या काळात पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी यजमान शाळांमधील वर्गांमध्ये सहभागी होतील. विविध सहशालेय उपक्रमांत भाग घेतील आणि स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर संबंधित प्रदेशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी प्रादेशिक अभ्यासदौरा आयोजित करण्यात येणार आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पर्यटनाचा अनुभव मिळणार नसून, वेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणात राहून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
परराज्यांतील विद्यार्थ्यांनाही पुणे दर्शनाची संधी
विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम केवळ पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या दौऱ्यापुरता मर्यादित नाही. जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील यजमान शाळांमधील विद्यार्थ्यांनाही पुणे जिल्हा परिषदेकडून पुणे भेटीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. या भेटीत त्यांना पुण्यातील शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक जीवनशैली अनुभवता येणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल.अशा परस्पर आदान-प्रदानातून विविध राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये मैत्री, परस्पर समज आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
शिक्षणाला गावाच्या सीमा ओलांडण्याची संधी
‘माझे गाव’ ते ‘माझे राज्य’ आणि ‘माझे राज्य’ ते ‘माझा देश’ असा विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाचा विस्तार करणे, हा ‘ज्ञान सेतू’ उपक्रमाचा व्यापक हेतू आहे. विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली अनुभवताना देशातील सर्व नागरिकांना जोडणारी समान मूल्ये विद्यार्थ्यांना समजणार आहेत. आपण वेगळे असलो, तरी एकाच राष्ट्राचे घटक आहोत, ही भावना त्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होणार आहे.
अनुभवातून विद्यार्थ्यांचे विश्व व्यापक होईल : वीरधवल जगदाळे
शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तके आणि वर्गखोलीपुरते मर्यादित नसते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशाची विविधता अनुभवता येईल, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेता येतील आणि विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी मैत्री निर्माण करता येईल. हा अनुभव त्यांचे विचारविश्व व्यापक करेल आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
विविधतेतून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होईल : विवेक वळसे-पाटील
भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेत आहे. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून तेथील परंपरा आणि जीवनशैली अनुभवल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती आपलेपणाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
शिक्षण वर्गखोलीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न : गजानन पाटील
पुणे जिल्हा परिषदेचा ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम ग्रामीण शिक्षणाला गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे. ‘ज्ञान सेतू’च्या माध्यमातून शिक्षण वर्गखोलीच्या पलीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विविधता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास, जिज्ञासा, नेतृत्वगुण आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
