Pune Graduate Election Voter Registration : पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी नवीन मतदारांना दि. २६ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी!
नवीन मतदार नोंदणी करण्याचे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आवाहन : दोन्ही मतदारसंघातील पात्र मतदारांना ऑनलाइनही मतदार नोंदणी करता येणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ सप्टेंबर २०२६ :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन मतदारांना येत्या दि. २६ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. ही ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने करण्याची सोय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी या मुदतीत मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक कार्यक्रम, आदर्श आचारसंहिता, मतदार नोंदणी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त तेली म्हणाल्या, "या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी नव्याने मतदार नोंदणीची संधी २६ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. या मतदार नोंदणीसाठीचे अर्ज संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. या अधिकाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि सर्व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. त्यानंतर झालेल्या मतदार नोंदणीसह २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या नवीन नोंदणीमुळे अंतिम मतदारसंख्येत बदल होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून केले जाणार आहे. मतदारांना मतदानाची प्रक्रिया समजावी यासाठी निवडणूक प्रशासनामार्फत जनजागृती केली जात आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी दि. ७ ऑक्टोबर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दि. ९ ऑक्टोबर आहे. दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, दि. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
ऑनलाइन मतदार नोंदणीची सोय
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी ऑनलाइन नवीन मतदार नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पात्र मतदारांना https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार नोंदणी करता येणार आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदाराचे छायाचित्र.
- पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका
- आधारकार्ड
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी नोंदणी करावी - रवींद्र भोसले
पुणे विभागातील पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी येत्या दि. २६ सप्टेंबरपर्यंत नवीन मतदारांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी केले आहे.
