Maharashtra Pradesh Mahila Congress Committee selection : महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची फेरनिवड 

पुण्यातील संगिता तिवारी यांची प्रदेश सरचिटणीस, अर्चना शहा-भिवरे पाटील यांची प्रदेश चिटणीस व स्वाती शिंदे यांची पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Maharashtra Pradesh Mahila Congress Committee selection : महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची फेरनिवड 
पुणे:- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस संगिता तिवारी, प्रदेश चिटणीस अर्चना शहा-भिवरे पाटील आणि पुणे शहर जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १८ ऑक्टोबर २०२५ :-  महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील संध्या सव्वालाखे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुणे शहरातील संगिता तिवारी यांची प्रदेश सरचिटणीस, अर्चना शहा-भिवरे पाटील यांची प्रदेश चिटणीस व स्वाती शिंदे यांची पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे सुमारे वर्षभराच्या खंडानंतर पुन्हा महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे. 

अखिल भारतीय महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी (दि.१७ ऑक्टोबर) जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत पुणे शहरातील संगिता तिवारी आणि अर्चना शहा-भिवरे पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. याआधीची महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची २०२१ मध्ये निवड करण्यात आली होती. या कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सव्वालाखे यांची निवड करण्यात आली होती. परंतू, ही कार्यकारिणीत डिसेंबर २०२४ मध्ये बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून सव्वालाखे याच प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. नवीन कार्यकारिणीत सव्वालाखे यांचीच महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. 

दरम्यान, नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी याआधी अखिल भारतीय महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सदस्य, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, यवतमाळ  महिला कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष, अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या आणि अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी काम केले आहे. नवनियुक्त सरचिटणीस संगिता तिवारी यांनी याआधी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष, पुणे शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी काम केले आहे. 

प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी नियुक्ती झालेल्या अर्चना शहा-भिवरे पाटील या मुळच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहेत. लग्नानंतर त्या पुणेकर झाल्या आहेत. अर्चना शहा-भिवरे पाटील यांनी याआधी पुणे जिल्हा महिला कॉंग्रेस उपाध्यक्ष,  पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न बहुजन महाआघाडीच्या प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद संघ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आदींसह विविध पदांवर काम केले आहे. त्या गेल्या २० ते २२ वर्षांपासून  सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. मराठा आरक्षण चळवळीतील नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणी लढ्यामध्ये त्या सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक आघाडीत ३ ते ४ वर्षे काम केले आहे‌. शिवाय गोवा, गुजरात,कर्नाटक निवडणूक प्रभारी म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद अभियान) मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, महिला काँग्रेसच्या पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी स्वाती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत महिला कांग्रेसच्या तत्कालीन शहर जिल्हाध्यक्षा  पूजा आनंद यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर संगीता तिवारी यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. मात्र, तिवारी यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्यानंतर हे पद  रिक्तच होते. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अखेर रिक्त असलेल्या शहराध्यपदावर स्वाती शिंदे यांची नियुक्ती केली आहे.नवनियुक्त जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांनी यापूर्वी प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काम केले आहे.