Health Check-up Camp : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे ९५'गर्भवतीं'ची आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक जनजागृतीपर मार्गदर्शनाचे आयोजन!
दर मंगळवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधा : ५१ 'गर्भवतीं'चा ओटी भरण्याचा उपक्रम
ग्रामराज्य वृत्तसेवा
रांजणगाव गणपती, दि. १९ ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती (ता. शिरूर)येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात 'गर्भवतीं'ची आरोग्य तपासणी आणि सन्मान करण्यासाठीच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ९५ 'गर्भवतीं'ची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आरोग्यविषयक जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ५१ 'गर्भवतीं'चा ओटी भरण्यात आली. ओटी भरलेल्या 'गर्भवतीं'ना साडी-चोळी,पौष्टिक आहार आणि आवश्यक औषधोपचाराचे साहित्य वाटप करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जनआरोग्य समितीच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सुर्यवंशी, रांजणगाव गणपती गावच्या सरपंच सौ. सुवर्णा वायदंडे, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शेलार, सविता धारीवाल यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
रांजणगाव गणपती परिसरातील 'गर्भवतीं'साठी दर मंगळवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. या परिसरातील सर्व 'गर्भवतीं'नी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सचिव सुर्यवंशी यांनी यावेळी केले. यावेळी 'गर्भवतीं'ना नियमित आरोग्य तपासणी,संतुलित व पौष्टिक आहार, औषधोपचार आणि गर्भावस्थेतील आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल 'गर्भवतीं'नी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
