Pune Zilla Parishad election 2026 : पुणे जिल्हा परिषदेसाठी ६८.३५ टक्के मतदान
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १.६५ टक्के कमी मतदान : वेल्हे तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक तर, बारामतीत सर्वात कमी मतदान
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ फेब्रुवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा ६८.३५ टक्के मतदान झाले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत १.६५ टक्के इतके कमी मतदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक ७९.२८ टक्के मतदान वेल्हे तालुक्यात तर, सर्वात कमी ५४.९० टक्के मतदान बारामती तालुक्यात झाले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती तालुक्यात कमी मतदान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले होते. त्यात यंदाच्या निवडणुकीत १.६५ टक्क्यांनी घट झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ इतके मतदार होते. यामध्ये १५ लाख २७ हजार १५१ पुरुष, १४ लाख ४९ हजार ५६० महिला आणि अन्य ९४ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी २० लाख ३४ हजार ७७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १० लाख ७६ हजार ५५८ पुरूष, ९ लाख ५८ हजार १९९ महिला आणि अन्य २९ मतदारांचा समावेश आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान (टक्केवारीत)
- जुन्नर --- ६१.१८ टक्के
- आंबेगाव --- ६५.३० टक्के
- शिरूर --- ७५.९६ टक्के
- खेड --- ७५.१७ टक्के
- मावळ --- ७७.२५ टक्के
- मुळशी --- ६३.९३ टक्के
- हवेली --- ६८.५८ टक्के
- दौंड --- ६८.४८ टक्के
- पुरंदर --- ६८.३२ टक्के
- वेल्हे --- ७९.२८ टक्के
- भोर --- ७५.६८ टक्के
- बारामती --- ५४.९० टक्के
- इंदापूर --- ६५.६९ टक्के
- एकूण --- ६८.३५ टक्के
