vice chancellor dr Sonwane : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंनी साधला पुण्यातील विद्यार्थी व युवकांशी संवाद! 

पुणे येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट या अभ्यासकेंद्रास भेट 

vice chancellor dr Sonwane : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंनी साधला पुण्यातील विद्यार्थी व युवकांशी संवाद! 
पुणे:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचा सत्कार करताना पुणे येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट या अभ्यास केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी.

ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुणे येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट या अभ्यासकेंद्रास भेट देऊन विद्यार्थी व युवकांशी संवाद साधला. 

यावेळी कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी या अभ्यासकेंद्रावरील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच परीक्षा पद्धती, परीक्षा नियोजन, निकाल व शिक्षण व्यवस्थेत युवकांना अपेक्षित नाविन्यपूर्ण सुधारणा आदी विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. शिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राबवित असलेल्या विविध अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली व तसेच त्या अभ्यासक्रमाचे महत्त्वही पटवून सांगितले. 

दरम्यान, यावेळी काही विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाबाबतचे आपापले अनुभव  कुलगुरूंना सांगितले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचे या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी  कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. 

यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट संस्थेच्यावतीने कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांचा सन्मान केंद्र संयोजक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक व शताब्दीची वाटचाल ही दो पुस्तके भेट देण्यात आली.

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक.डॉ. व्ही. बी. गायकवाड, केंद्र संयोजक गोविंद सूर्यकांत नामदे,  प्रा.दत्तात्रय ठोसर,सूर्यकांत शिंदे, संजय गौड व शुभम जाधव आदी उपस्थित होते.