Pune zilla Parishad school teachers selling school uniforms :- शाळा अन् विद्यार्थ्यांना शिकविणे सोडून झेडपी शाळांमधील काही गुरूजी करतात गणवेश विक्रीचा धंदा!
पुणे जिल्ह्यातील प्रकार : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून एका गुरूजीला कारणे दाखवा नोटीस

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ जून २०२५ :- शिक्षक म्हटलं की शाळा आणि शाळा म्हटलं की विद्यार्थी हे समिकरण आपोआपच जुळून येतं.जिल्हा परिषद शाळेवरील गुरूजी म्हणजे सरकारी नोकरदार. राज्य सरकार दरवर्षी प्राथमिक शिक्षणावर अफाट खर्च करत आहे. या खर्चातील सुमारे ७० टक्के खर्च हा फक्त शिक्षकांच्या वेतनावर होतो. तरीसुद्धा सरकारी शाळांवरील काही शिक्षक हे त्यांना ज्यांच्यासाठी पगार दिला जातो ते काम म्हणजे शाळा आणि शिकविणे सोडून भलताच उद्योग करत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. एवढेच कमी की काय, आता जिल्हा परिषद शाळांमधील काही शिक्षक हे चक्क शाळांना लागणारे स्टेशनरी साहित्य आणि शालेय गणवेश विक्रीचा धंदा करु लागले आहेत. याबाबत पुणे जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी एका शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शालेय गणवेश विक्रीचा धंदा करणारे गुरूजी हे पत्नी किंवा मुलांच्या नावावर दुकानाचा परवाना काढत आहेत. त्यानंतर झेडपी शाळेवर असलेले गुरुजी शाळा व शिकवणी सोडून देऊन जगजाहीरपणे शालेय साहित्य व गणवेश विक्रीचे मार्केटिंग करून विविध शाळांतील गणवेश पुरवठा आदेश मिळण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना गळ घालत असल्याचे जिल्हा परिषदेला दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या Pune तक्रारीची जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी खेड तालुक्यातील एका शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाची पत्नीसुद्धा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरकारतर्फे प्रत्येकी दोन गणवेश, शुज व सॉक्स दरवर्षी मोफत दिले जातात. याचाच फायदा घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील काही प्राथमिक शिक्षक नोकरी सोडून गणवेश विक्रीचे काम करत आहेत.
संबंधित शिक्षकांकडून गणवेशासाठी हलक्या दर्जाच्या कापडाचा वापर
विशेष म्हणजे संबंधित शिक्षक हे विविध शाळांना भेटी देऊन तेथील मुख्याध्यापकांना एका नामवंत कंपनीचे उत्तम दर्जाचे कापड दाखवतात आणि प्रत्यक्षात गणवेशासाठी मात्र हलक्या दर्जाचे कापड वापरून मोठी कमाई करत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणारे शालेय साहित्य
- प्रत्येकी दोन गणवेश
- शूज (बुट)
- दोन पायमोजे (सॅाक्स)
- एक टिफिन बॅग
- १ बेल्ट
- ओळखपत्र (आयडेंटी कार्ड)