Gramsevak GPS & biometric attendance : महाराष्ट्रातील ग्रामसेवकांची आता जीपीएस आणि बायोमेट्रिकद्वारे हजेरी, ग्रामसेवकांना दररोज ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थिती बंधनकारक! 

राज्याच्या ग्रामविकास विभागाचा निर्णय : या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश 

Gramsevak GPS & biometric attendance : महाराष्ट्रातील ग्रामसेवकांची आता जीपीएस आणि बायोमेट्रिकद्वारे हजेरी, ग्रामसेवकांना दररोज  ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थिती बंधनकारक! 
पुणे:- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीबाबत ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ ऑगस्ट २०२६ :- महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची (पुर्वाश्रमीचे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी) जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यानुसार सर्व आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची या प्रणालीद्वारे हजेरी घेण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. यामुळे सर्व ग्रामसेवकांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात आणि गावात उपस्थित रहावे लागणार आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची उपस्थिती अधिक पारदर्शक आणि नियमित करण्यासाठी जीपीएस व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा हा आदेश देण्यात आला आहे. राज्य सरकारने याआधीही हा निर्णय घेतला होता. मात्र, संबंधित यंत्रणांकडून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. यामुळे आता पुन्हा एकदा मंगळवारी एका लेखी पत्राद्वारे कठोर सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात ग्रामविकास विभागातील कक्ष अधिकारी नितीन पवार यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्याबाबत यापूर्वीच संबंधितांना कळविण्यात आले होते. त्यानंतरही या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा पत्र देऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी जीपीएस व बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामस्थांना विविध शासकीय योजना, दाखले, प्रमाणपत्रे आणि ग्रामपंचायतीशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांची कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी हजेरी प्रणाली अधिक प्रभावी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जीपीएस आधारित हजेरीमुळे संबंधित अधिकारी नेमक्या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही, याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. तर बायोमेट्रिक हजेरीमुळे प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद डिजिटल पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे.