construction worker's students : कष्टकरी बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांच्या पाठीवर पडणार कौतुकाची थाप!
गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव, शैक्षणिक साहित्याही भेट : बिल्डर्स असोसिएशन पुणे सेंटरचा पाच वर्षांपासून प्रेरणादायी उपक्रम
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ :- पुणे शहराच्या आणि समाजाच्या विकासासाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे सेंटरच्या वतीने यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. येत्या दि. १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे १०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि शैक्षणिक साहित्याची भेट देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे.
बांधकाम कामगारांचे कुटुंब म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही भविष्य घडविण्यासाठी सुरू असलेला संघर्ष होय. आई-वडील दिवसभर उन्हातान्हात, धुळीत आणि प्रतिकूल वातावरणात कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत त्यांची मुले शिक्षणाची वाट धरतात. अनेक अडचणींवर मात करून ही मुले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांच्या या गुणवत्तेची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे सेंटरकडून मागील पाच वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे कामगार सहआयुक्त अभय गिते व डॉ. अजयकुमार लोळगे उपस्थित राहणार आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप ही केवळ एका पुरस्काराची बाब नसून त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाला मिळणारे आत्मविश्वासाचे बळ आहे. आपली गुणवत्ता ओळखली जाते, आपल्या कष्टांचे कौतुक होते आणि आपणही मोठे स्वप्न पाहू शकतो, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे या असोसिएशनच्या पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर आणि उपाध्यक्ष राजाराम हजारे यांनी सांगितले. हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या सत्कारापुरता मर्यादित नाही. कष्टकरी बांधकाम कामगारांच्या कुटुंबाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव या उपक्रमातून व्यक्त होते, अशी भावनाही अजय गुजर आणि राजाराम हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.
बांधकाम कामगारांच्या कष्टातून शहरांची उभारणी होते. मात्र त्या कष्टकरी हातांच्या पुढील पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याची गरज आहे. या भावनेतूनच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात असल्याचे या असोसिएशनचे सदस्य रविंद्र भोसले यांनी सांगितले. बांधकाम कामगारांच्या कष्टातून उभ्या राहणाऱ्या समाजाच्या भावी पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणे, हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे, असेही भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
एखाद्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक यशाची सार्वजनिकपणे दखल घेतली जाणे, त्याला प्रशस्तिपत्र मिळणे आणि समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा गौरव होणे, ही त्याच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी बाब ठरते. विशेषतः कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा गौरव त्यांच्या संघर्षाला मिळालेली सामाजिक मान्यता ठरू शकतो. आज मिळणारी ही शाबासकीची थाप उद्याच्या मोठ्या स्वप्नांची सुरुवात ठरावी आणि बांधकाम कामगारांची मुले शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावीत, हाच या उपक्रमाचा गाभा आहे.
- अजय गुजर
अध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे सेंटर.
