RTE Admission inquiry : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसारच्या प्रवेशाबाबतच्या पुणे जिल्ह्यातील सर्व तक्रारींची चौकशी करु!
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सर्वसाधारण सभेत ग्वाही : खेड तालुक्यातील प्रवेशाबाबतच्या चौकशी अहवालानंतर होणार कार्यवाही
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ जुलै २०२६ :- बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई) चालू शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सोमवारी (दि. २७ जुलै) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना दिले. परंतु, सध्या राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील तक्रारींबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असेही जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठया प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला होता. याबाबत लेखी तक्रार देऊनही, यामध्ये पुढे काहीच न झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते विजयसिंह शिंदे यांनी केला होता. मात्र आपण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्तांनी शिक्षण सहसंचालकांना चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले. परंतु, ही चौकशी केवळ खेड तालुकयातील प्रवेश प्रकियेची असून, आम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्यातील प्रवेश प्रकियेची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी संपूर्ण पुणे जिल्हयातील प्रकियेची चौकशी केली जाईल. मात्र त्यासाठी आधी शिक्षण सहसंचालकांचा चौकशी अहवाल येऊ द्या. त्यानंतर संपूर्ण पुणे जिल्हा प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली जाईल, असे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांनी खेड तालुक्यासह सर्वच ठिकाणी आरटीई प्रवेशामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप याआधी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि खेड तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणारे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना पुणे विभागीय मंडळाच्या कार्यालयात सर्व कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या.या एकूणच प्रवेश प्रकियेबाबत सोमवारी पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
