Zilla Parishad election 2026 : पुणे जिल्हा परिषदेच्या पाच माजी पदाधिकाऱ्यांसह २३ माजी सदस्य पुन्हा एकदा झेडपीच्या निवडणूक आखाड्यात!
पदाधिकाऱ्यांत तीन माजी उपाध्यक्ष व दोन सभापतींचा समावेश : अन्य १६ माजी सदस्यांचे जवळचे नातेवाईकही रिंगणात
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २ फेब्रुवारी २०२५ :-पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आखाड्यात तीन माजी उपाध्यक्ष, दोन माजी सभापतींसह तब्बल २३ माजी सदस्य उतरले आहेत. याशिवाय अन्य १६ माजी सदस्यांचे नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या नातेवाईकांमध्ये दोन माजी अध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तीन माजी उपाध्यक्षांमध्ये आंबेगाव तालुक्यातील दोन तर, भोर तालुक्यातील एका माजी उपाध्यक्षांचा तर, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम केलेल्या जुन्नर, पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका माजी अध्यक्षांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील माजी अध्यक्ष विजय कोलते यांचे पूत्र गौरव कोलते आणि जुन्नर तालुक्यातील माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सूनबाई मोनाली लांडे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असलेल्या माजी उपाध्यक्षांमध्ये अरुण गिरे व विवेक वळसे पाटील (दोघेही ता. आंबेगाव) आणि रणजित शिवतारे (ता. भोर) यांचा समावेश आहे. अरुण गिरे हे शिवसेनेच्या वतीने तर, विवेक वळसे पाटील व रणजित शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक लढवत आहेत.
महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे (ता. हवेली) आणि कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार (ता. शिरूर) हे दोन माजी सभापती पुन्हा एकदा यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.
झेडपीच्या निवडणूक रिंगणात उतरलेले माजी सदस्य
- आशा बुचके
- स्नेहल शेळके
- गुलाब पारखे
- तुलशी भोर
- रेखा बांदल
- स्वाती पाचूंदकर
- दत्तात्रेय गुंड
- शांताराम इंगवले
- दत्तात्रेय झुरंगे
- हेमंतकुमार माहूरकर
- अमोल नलावडे
- चंद्रकांत बाठे
- विठ्ठल आवाळे
- अंकिता पाटील
- श्रीमंत ढोले
- वीरधवल जगदाळे
- वैशाली वाबळे
- तनुजा घनवट
