Pdcc Bank Ajitdada Pawar Krishi Samruddhi Loan Scheme Launched : पुणे जिल्हा बँकेच्या कृषी समृद्धी कर्ज योजनेमुळे 'अजितदादां'चे स्वप्न साकारेल!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अपेक्षा : जिल्हा बँकेच्या 'अजितदादा पवार कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ जुलै २०२६ :- महाराष्ट्रातील सर्व शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत, हेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असत. यानुसार शेतकरी समृध्द व्हावा, या उद्देशाने शेतीत कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढविण्याचे त्यांचे ध्येय होते. या ध्येयातूनच दिवंगत अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित शेतीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित शेतीसाठी 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना सुरु केली आहे. यामुळे 'अजितदादां'चे स्वप्न साकारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्ज योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२४ जुलै) पुणे येथे करण्यात आला. शिवाय यानिमित्ताने शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शंकर मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष (कात्रज डेअरी) अरुण चांभारे, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे,बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, बॅंकेचे सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, "बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने असून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना सुरु केली आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेती ही क्रांतिकारक चळवळ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. ही योजना ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. यामुळे ऊस उत्पादनामध्ये ४० टक्के वाढ, पाण्याची ३० टक्के बचत व रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाचा बारामतीमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे."
राज्य सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महिला शेतकऱ्यांना अधिकृत महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक कायदा केला आहे. दिवंगत अजित पवार यांनी नेहमीच महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च स्थान दिले होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची प्रतीकात्मक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी २२ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही पहिली यादी २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची आहे. कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झालेले शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करतील असा या योजनेमागचा उद्देश आहे. बळीराजा हा केवळ अन्नदाता नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ असतो, असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची नेहमीच राज्य सरकारची भूमिका आहे. याच हेतूने 'पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत या योजनेत मिळणार आहे. या योजनेमुळे २ हजार कोटी रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना ४८ हजार कोटी रुपयांची वीजबील माफी दिली आहे. यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री पाणंद रस्ते, सौरऊर्जा अशा अनेक योजना सरकार राबवत असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यावेळी सांगितले.
पुणे जिल्हा बँकेची अजित पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी, शेतीला आधुनिकतेची जोड देणारी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना असल्याचे मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
या समारंभात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात पात्र पाच शेतकऱ्यांना लाभ वितरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी व महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या योजनेची माहिती दिली. या योजनेसाठी बॅंकेने १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून अचूक शेती, कीड व रोग ओळख, हवामान अंदाज आणि हवामान लवचिकता यामधील उपयोग याविषयी माहीत दिली.
