Purandar Urban Credit Society Annual General Meeting concluded : पुरंदर नागरी पतसंस्थेची नागरी सहकारी बँकेकडे वाटचाल : ३४८ कोटींच्या मुदतठेवी
माजी आमदार संजय जगताप यांची माहिती : ३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
ग्रामराज्य वृत्तसेवा
सासवड, दि. २९ सप्टेंबर २०२५ :- पुरंदर नागरी पतसंस्थेमधील मुदत ठेवी आता ३४८ कोटींवर पोहोचल्या असून, या पतसंस्थेच्या वतीने सभासदांना २६६ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. या पतसंस्थेची ही मोठी प्रगती असून, यामुळे पतसंस्थेची आता नागरी सहकारी बँकेकडे वाटचाल सुरू झाली आहे, अशी माहिती पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी रविवारी (दि.२८) झालेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.
पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) उत्साहात पार पडली. या सभेत बोलताना संजय जगताप यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. या सभेला सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप आणि उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी आदी उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले, "सभासदांनी संस्थेचे संस्थापक स्व.चंदुकाका जगताप यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाने संस्थेची मोठी प्रगती झाली आहे. पतसंस्थेच्या सध्या १३ शाखा असून, १४ हजार ३४७ सभासद आहेत. सध्या संस्थेचे २५ कोटींचे अधिकृत भागभांडवल आहेत. सरत्या आर्थिक वर्षात पतसंस्थेला १ कोटी ५ लाख ८८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. लेखा परीक्षणात सातत्याने 'अ' वर्ग मिळत असून, यंदाही सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
या सभेला संचालक अंकुश जगताप, राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, अनिल कामठे, बाबासाहेब चौंडकर, चंद्रकांत बोरकर, परशुराम तांबे, सुर्यकांत कांबळे, अमोल सातभाई, अॅड किशोर म्हस्के, पोपटराव सोनवणे, कल्याण जेधे, सुनील खोपडे, नंदकुमार निरगुडे, घनश्याम तांबे, व्यवस्थापक सतीश शिंदे, हरीभाऊ शिंदे आदींसह सभासद, शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला पतसंस्थेचे संस्थापक चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती दिली. संचालक डॉ. विनायक खाडे यांनी प्रास्ताविक केले. सभेचे सूत्रसंचालन नंदकुमार सागर यांनी केले. संचालक आनंदराव घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
