Friendship between leaders of all parties in Pune : ये दोस्ती, हम नहीं छोडेंगे : पुण्यातील हॉटेल सुभद्रा मैत्री कट्ट्यावर सलग ४० वर्षांपासून मित्रांची धमाल! 

पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या मैत्रीचे हक्काचे व्यासपीठ :  इथे ना कोणी साहेब,ना बॉस, फक्त दादा, भाऊ, मामा, काका अन् अण्णाच.  

Friendship between leaders of all parties in Pune : ये दोस्ती, हम नहीं छोडेंगे : पुण्यातील हॉटेल सुभद्रा मैत्री कट्ट्यावर सलग ४० वर्षांपासून मित्रांची धमाल! 
पुणे:- मैत्री कट्ट्याला भेट देण्यासाठी आलेले खासदार विशाल पाटील यांचा सत्कार करताना जालिंदर कामठे व अन्य सदस्य.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ :-  गाव असो की शहर किंवा नेता असो की कार्यकर्ता. मैत्रीला काही  वय, व्यावसाय, नोकरी, धंदा किंवा राजकीय पक्ष किंवा त्या त्या पक्षाची विचारधारा असं कसलंही बंधन नसते. अशाच अनोख्या मैत्रीचा आदर्श पुण्यातील हॉटेल सुभद्रा मैत्री परिवार आणि जालिंदर कामठे मित्रपरिवार या मैत्री कट्ट्याने घालून दिला आहे. विशेष म्हणजे या कट्ट्यावर पुणे शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते हे आठवड्यातून एक दिवस हमखास चहा-पानासाठी एकत्र येत आहेत. 

मागील सलग चार दशकांपासून ही परंपरा अखंडीतपणे चालू आहे. यामध्ये अगदी गावपातळीवरील कार्यकर्त्यापासून, आमदार, खासदार, मंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेल्या सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. इथे ना कोणी बॉस असतो, ना कोणी साहेब. इथे फक्त फक्त दादा, भाऊ, मामा, काका अन् अण्णा, अशा ओळखल्या जाणाऱ्या टोपणनावांनीच चर्चांच्या फैरी झडत असतात. 

कोणताही मैत्रीचा कट्टा म्हणजे केवळ विटांच्या भिंतीवर, गावाच्या पारावर, पंचतारांकित हॉटेलात बसायची जागा नाही, तर, हा मैत्री कट्टा म्हणजे राजकारणाच्या रणांगणातून सुट्टी मिळालेली जणू मैत्रीची संसदच आहे,  याचाच प्रत्यक्ष प्रत्यय या कट्ट्याने आणून दिला आहे. आठवडाभर आपापला पक्ष, पक्षाचे काम, पक्षाच्या  विचारधारेचा प्रचार-प्रसार करायचा. यासाठी जोशात भाषणे करायची. सभा गाजवायच्या पण ठरलेल्या दिवशी मात्र सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते या हॉटेल शुभद्रा कट्ट्यावर एकत्र  येतात आणि चहाच्या कपासोबत “ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे” याचा प्रत्यय आणून देतात. 

या कट्ट्यावर कोणालाही पक्षाच्या नावाने हाक मारायची नाही किंवा पक्षाच्या विचारधारेवर बोलायचे नाही, हे आधीच सर्वानुमते ठरलेलं. त्यामुळे इथे काका,भाऊ, अण्णा, आबा,मामा अशीच नावे चालतात. कोणी एखादा विनोद सांगितला की, प्रतिस्पर्धी पक्षाचा नेतादेखील पोट धरून हसतो. एखाद्याने निवडणुकीत घडलेला एखादा किस्सा सांगितला तर बाकी सगळे त्याची खिल्ली उडवतात आणि तोही हसत हसत मान डोलावतो. खरं तर अशा कट्ट्यामुळेच गावकुस असो की शहर, तेथे शांतता आणि मैत्री टिकून राहते. म्हणूनच हे सगळे कट्टेवाले म्हणतात, “सत्ता येईल, जाईल, पण आपला मैत्रीचा कट्टा कायम राहील. कारण, दोस्तीवर कोणत्याही पक्षाचा हक्क नाही!”

मैत्रीच्या कट्ट्यावर एवढं लिहिण्यासाठी कारण ठरलं‌, ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू खासदार विशाल पाटील, यांनी या  कट्ट्याला दिलेल्या भेटीचे. वसंतदादा पाटील हे कॉंग्रेसचे नेते होते. तीच परंपरा अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या घराण्याने कायम राखली. पण कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी ही लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि त्यात ते विजयी झाले. पाटील हे खासदार आणि हॉटेल सुभद्रा मैत्री कट्ट्याच्या आयोजकत्वची जबाबदारी सांभाळणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे हेसुद्धा मूळचे कॉंग्रेसचेच. सध्या कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.विशाल पाटील यांच्या या भेटीसाठी निमित्त ठरले ते जालिंदर कामठे यांनी स्थापन केलेल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे‌. कामठे यांनी त्यांच्या प्रतिष्ठानला आपल्या आजोबांचे (वसंतदादा) नाव दिल्याच्या भावनेतून खासदार विशाल पाटील हे या कट्ट्याच्या भेटीसाठी आले होते. 

दरम्यान, या कट्ट्याला याआधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आदींनी भेट दिली आहे. जालिंदर कामठे मित्र परिवार आणि हॉटेल सुभद्रा मैत्री कट्टा परिवारातर्फे यावेळी खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हा मैत्री कट्टा सन १९८५-८६ पासून अखंडितपणे चालू असल्याचे जालिंदर कामठे यांनी यावेळी सांगितले. 

या मैत्री कट्ट्यावर कामठे यांच्यासह शेखर महाराज कुटे, सतीश मोहोळ, बापूराव घाटगे, मारुतीराव किंडरे, बाळासाहेब डुंबरे, मुरली निंबाळकर, कुंदन परदेशी, दत्ता करंजकर, विजय कदम, विजय जाधव, सुर्यकांत माने, अॅड. एन. डी. धायगावे पाटील, मदन शिंदे, रमेश खांदवे, संतोष गलांडे पाटील, भाऊसाहेब भोसले आणि संजय ऊभे आदी सहभागी होत असतात.