The historical tradition of one family, one Gauri :-तब्बल अडीचशे वर्षांपासून जपली जातेय 'एक कुटुंब एक गौरी'ची ऐतिहासिक परंपरा! 

भोर तालुक्यातील साळवी कुटुंबाची किमया :  २५० वर्षांपुर्वीचा लाकडात कोरलेला गौरीचा मुखवटा 

The historical tradition of one family, one Gauri :-तब्बल अडीचशे वर्षांपासून जपली जातेय 'एक कुटुंब एक गौरी'ची ऐतिहासिक परंपरा! 
भोर:- साळवीवाडी (ता. भोर) येथील साळवी कुटुंबातील गौरीची ऐतिहासिक मुर्ती.

संतोष ढवळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

भोर, दि. ३१ ऑगस्ट २०२५ :- महाराष्ट्रात हल्ली घराघरांत गौरी-गणपतीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस गावागावात गणेश मंडळांची संख्या वाढू लागल्याने सरकारने 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अंमलात आणण्यास सुरुवात केली. काळाच्या ओघात जशी गावागावात गणपतींची संख्या वाढू लागली, तसेच घराघरांत गौरींची संख्या वाढू लागली आहे‌. परिणामी एकाच कुटुंबातील प्रत्येक भावाच्या घरी स्वतंत्र गौरी बसविण्यास सुरुवात झाली. याला भोर तालुक्यातील साळवीवाडी येथील साळवी कुटुंब अपवाद ठरले आहे.

आजघडीला या गावात स्वतंत्र १७ साळवी कुटुंब आहेत. पण आजही या सर्व कुटुंबात मिळून एकूच गौरी बसविली ‌जात आहे. ही परंपरा अगदी अलीकडच्या काळातील नसून तब्बल अडीचशे वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे‌.या ऐतिहासिक परंपरेतून साळवी कुटुंबाने समाजासमोर 'एक कुटुंब एक गौरी'चा नवा आदर्श घालून दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील वीसगाव खोऱ्यातील वरवडी पाले तर्फे साळवीवाडी (ता.भोर) येथील साळवी कुटुंबीयांकडून सुमारे अडीचशे वर्षांपासून ही ऐतिहासिक परंपरा जपली जात आहे. या ऐतिहासिक गौरी उत्सवासाठी सुमारे अडीचशे वर्षापूर्वींचा अखंड लाकडात कोरलेला गौरीचा पारंपारिक मुखवटा आजही पूजला जात आहे.भोरपासून दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर वरवडी पाले तर्फे साळवीवाडी नावाचे संस्थानकालीन टूमदार गाव आहे. या गावात एकूण ३७ कुटुंबे असून त्यात साळवी आडनाव असलेली १७ कुटुंबे आहेत. गावात सुमारे अडीचशे वर्षापासून साळवी घराण्यातील कुटुंबीयांमध्ये 'एक गौरी' हा ऐतिहासिक परंपरा असलेला गौरीचा सण पूर्वांपार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे साजरा केला जात आहे.

गौरी प्रतिष्ठापनेसाठी शेकडो वर्षापूर्वीचा अखंड लाकडात कोरलेला गौरीचा सुबक, देखणा पारंपारिक मुखवटा वापरला जातो. गौरी उत्सवाची ही पूर्वांपार चालत आलेली परंपरा साळवीवाडीतील साळवी घराण्यातील कुटुंबियांकडून पिढ्यानपिढ्या मनोभावे एकोप्याने जतन केली आहे. साळवी कुटुंबीयांकडे वंशजाकडून वारशात आलेला गौरीचा लाकडी मुखवटा परंपरेनुसार साळवी कुटुंबातील परशुराम साळवी यांच्याकडे असतो. एरवी वर्षभर बंधिस्त ठेवण्यात आलेला गौरीचा मुखवटा गौरी उत्सवाच्यावेळी बाहेर काढला जातो. गौरी आगमनाच्या निमित्ताने महिला गावाजवळील पाणवठ्यावर एकत्र येतात. तेथे गौरी बसविण्यासाठी पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या ठेवणीमध्ये तेरड्याच्या फुलांंचे झुडूप रोवले जाते.त्याची हळदी कुंकवाचं लेणं लेवून पूजा,आरती करून मिरवणूकीने वाड्यात आणली जाते. तेथे लाकडात कोरलेल्या पारंपारिक मुखवट्याची महिला पूजा करतात. त्यानंतर तेरड्याचे झुडूप रोवलेल्या ठेवणीवर पारंपारिक लाकडी मुखवठा बसवला जातो. त्या मुखवट्यास नवी साडी,मुकूटासह सौभाग्य आभूषणांचा साज चढवला जाऊन गौरीची प्रतिष्ठापना केली जाते.पुजा विधीवेळी गौरीची पारंपारिक गाणी म्हटली जातात.

यानुसार गौरीचे माहेरी आगमन झालेले असते. त्यामुळे तिचे कोडकौतुक करण्यासाठी उत्सवादरम्यान तीन रात्री उशिरापर्यंत गौरी जागविण्याचा कार्यक्रम केला जातो. यामध्ये  भजन, पारंपारिक गाण्याबरोबर फेर धरणे, झिम्मा,फुगडी यासारखे महिलांचे कार्यक्रम चांगलेच रंगतात.गौरी उत्सवाच्या वेळी रोज  सकाळी पूजा आरती केली जाते. त्यापूर्वी रोज सकाळी नवी साडी नेसवली जाते. तीन दिवसांच्या गौरी उत्सवात साळवी वाडीतील महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे साळवी कुटुंबातील वृद्ध असलेल्या हिराबाई तुकाराम साळवी, सुभद्राबाई कृष्णा साळवी यांनी सांगितले. 

'गौरी रडण्याची वेळा' 

दरम्यान, गौरी विसर्जनाच्या दिवशी  म्हणजेच सासरी धाडण्याच्या दिवशी गौरीचा चेहरा रडवेला दिसतो. त्यादिवशी पहाटे पारंपरिक गाण्यातून गौरीची महिलांकडून समजूत काढली जाते. त्याला 'गौरी रडण्याची वेळा' असे म्हटले जाते. त्यानंतर  गौरी पाठवणीचा म्हणजेच गौरी विसर्जनाचा कार्यक्रम होतो. त्यामध्ये पारंपारिक मुखवटा असलेल्या ठेवणीसह गौरीची हातावर तोलून धरून वाजतगाजत पाणवठ्यापर्यंत मिरवणूक काढतात.हतेथे आरती होऊन पहिल्या दिवशी मुखवट्याखाली ठेवणीच्या आंतरभागात ठेवलेले तेरड्याचे झुडप बाहेर काढून त्यावर दिवा लावला जातो व तेरड्याचे झूडूप दिव्यासह पाण्यात सोडले जाते. त्यानंतर मुखवटा साळवीवाड्यात वडिलघरी परशुराम साळवी यांच्याकडे सुपूर्त केला जातो. यावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्याव देखिल खिन्नता दाटल्याचे दिसते. त्यानंतर ऐतिहासिक परंपरा असलेल्या गौरीच्या उत्सवाची सांगता होते. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले साळवी कुटुंबिय गौरीच्या पारंपारिक सणाला आवर्जून उपस्थित राहत असतात. 

ऐतिहासिक गौरी सणाची कुळकथा

तत्कालीन भोर संस्थानच्या संरक्षण दलात कोकणातून आलेले साळवी आडनाव असलेले गृहस्थ चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होते. ते साळवी घराण्याचे मूळ वंशज मानले जातात. त्यांना भोर संस्थानचे तत्कालीन अधिपती पंतसचिव यांनी वरवडी पाले परिसरातील जमीन ईनाम म्हणून दिली असल्याने ते कुटूंबासह त्या परिसरात वास्तव्याला आल्याचे साळवी घराण्याचे वंशज परशुराम साळवी यांनी सांगितले. कोकणातील माणुस हा सण समारंभ व त्यासंदर्भातील रूढी परंपरा जपणारा असतो. त्याकाळी त्यांनीसुद्धा  येथे कोकणातील पारंपारिक पद्धतीनुसार लाकडी मुखवटा असलेला गौरीचा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. तेंव्हापासून चालत आलेल्या प्रथा परंपरेनुसारच तीन दिवसांचा गौरीचा सणआजही साळवी कुटुंबीयांकडून साजरा केला जात आहे. दोन वर्षातून एकदा मुखवटा रंगवला जातो.

तेरड्याचा रंग तीन दिवस

तेरडा हे फुलझाड सर्वत्र आढळते. तेरड्याच्या फुलाचा जीवनकाळ तीन दिवसांचा असतो. त्यानंतर ते फूल लय पावते. गौरी सण हा तीन दिवस चालतो. त्यामुळे गौरी सणात तेरड्याच्या फुलाला मान असतो. त्यावरूनच तेरड्याचा रंग तीन दिवस ही म्हण तयार झाली असल्याचे साळवी कुटूंबीयांकडून सांगण्यात आले.