Kharif Season in Maharashtra : महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात १४५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे कृषी खात्याचे नियोजन!

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती: 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर यंदा सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज

Kharif Season in Maharashtra : महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात १४५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे कृषी खात्याचे नियोजन!
पुणे:- कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि.२१ एप्रिल २०२६ :- महाराष्ट्रात यंदाच्या खरीप पीक हंगामात एकूण १४५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण करण्याचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे. 

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ही माहिती दिली. खरीप हंगाम सन २०२६ च्या नियोजनासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने पुणे येथे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेनंतर  भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. खरीप हंगामात पेरणी करण्यात येणाऱ्या पिकांमध्ये सोयाबीन, भात,मका, तूर, उडीद व कापूस आदींचा समावेश असणार आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के इतके राहण्याची शक्यता असून, ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता तसेच काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे काम राज्य सरकार आणि कृषी विभागामार्फत सुरू असल्याचेही  भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यावेळी बोलताना भरणे पुढे म्हणाले, "राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केलेली आहे. यानुसार येत्या ३० जुनच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. या कर्जमाफीसंदर्भातील शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे व निकष ठरविण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे."

भरणे पुढे म्हणाले, "आगामी खरीप हंगाम २०२६ च्या अनुषंगाने या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सुचना  दिल्या आहेत. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यंदाचा हा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील."

या कार्यशाळेला राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, 'महाबीज'चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, कृषी विभागाचे सर्व उपसचिव, सर्व कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक, हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ, सर्व कृषी संचालक, सर्व विभागीय कृषी संचालक, सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे सर्व प्रकल्प संचालक, सर्व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी आयुक्तालयातील सर्व सह संचालक व कृषी उप संचालक उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी २०.१७ लाख क्विंटल बियाणांची गरज 

महाराष्ट्रातील यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यासाठी एकूण २०.१७ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात २८.०५ लाख क्विंटल (१३९ टक्के) बियाणे उपलब्ध आहेत. याशिवाय राज्यात एकूण ४८.८० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. त्यामुळे चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची टंचाई भासणार नाही. तसेच खतांच्या आणखी मागणीसाठी केंद्र सरकारकडे  पत्रव्यवहार सुरु असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यावेळी सांगितले. 

संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभाग सज्ज 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के इतके राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ‘एल निनो’च्या स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, शेतीच्या उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे. याकरिता महाकृषि ॲपच्या माध्यमातून हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके कृषी विभागामार्फत घेणे सुरु आहे. तसेच महाविस्तार ॲप, कृषि विभागाचे यु ट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप चॅनेल या सामाजिक माध्यमांच्या माध्यमातूनही हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षभरात १३६.२८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान 

दरम्यान, गेल्या वर्षीच्या म्हणजेच सन घ्या २०२५ फेब्रुवारीपासून यंदाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत म्हणजेच सुमारे वर्षभराच्या कालावधीत राज्यातील १ कोटी ३६ लाख २८ हजार शेतकऱ्यांचे १ कोटी ०५ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडूध २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच यंदाच्या मार्च व एप्रिल या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे.तसेच मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले.