NCP woman office-bearer attempts suicide : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!
भर सभागृहात प्रवेश करत, स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले : जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडून सुरक्षेबाबत कानउघाडणी
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ जुलै २०२६ :- पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने सोमवारी (दि. २७ जुलै) पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात अचानकपणे प्रवेश करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्वसाधारण सभा चालू असतानाच अचानक सभागृहात प्रवेश करत, व्यासपीठासमोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत,आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे जिल्हा परिषद सभागृहात खळबळ उडाली. मात्र, सभागृहाबाहेरील सुरक्षा रक्षक व सेवकांनी सभागृहात तातडीने धाव घेत संबंधित महिला पदाधिकाऱ्याच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, या प्रकाराबाबत जिल्हा परिषद प्रशासनाची कानउघाडणी केली. शिवाय सभागृहातील उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अध्यक्ष जगदाळे यांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा आदेश दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महिला पदाधिकाऱ्याने पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात येऊन अशा प्रकारे आत्मदहन करण्याचा प्रयत्न का केला, हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र या महिला पदाधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या एका सदस्याबाबत गंभीर आरोप केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दबक्या आवाजात सुरू होती.
पुणे जिल्हा परिषदेचे चालू अर्थिक वर्षाचे (सन २०२६.२७) पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा निमंत्रित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे होते. सभेच्या सुरूवातीला दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. सभागृहात पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असतानाच अचानकपणे ही महिला पदाधिकारी सभागृहात आली. सभागृहात प्रवेश करताच, तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सर्वजण आवाक झाले. तातडीने या महिलेस ताब्यात घेऊन तिची रवानगी हिरकणी कक्षात करण्यात आली.
