Chief Minister's Samriddh PanchayatRaj Campaign : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज'मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांच्या पाठीवर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे मारणार कौतुकाची थाप!
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष समृद्ध ग्राम संवाद उपक्रम सुरू करणार : महिन्यांतून दोन वेळा जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार 'जिल्हा परिषद अध्यक्ष समृद्ध ग्राम संवाद या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केलं जाणार आहे.
हा उपक्रम प्रत्येक महिन्यात दोन वेळा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमात संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्षांशी समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील सुमारे पावणे तीनशे ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामपंचायतींचे सुशासन, लोकसहभाग, विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल कार्यपद्धती, स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन आणि ग्रामविकासाच्या विविध घटकांमध्ये उत्कृष्ट कार्य करून पुणे जिल्ह्याने राज्यात आदर्शवत स्थान निर्माण केले असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
दरम्यान, यावर्षीसुद्धा पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अभियानाच्या विविध निकषांनुसार नियोजनबद्ध कार्यवाहीस प्रारंभ केला असून, अभियानातील कामकाज अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अभियानास अधिक गती मिळावी, ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करता याव्यात तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून “जिल्हा परिषद अध्यक्ष समृद्ध ग्रामसंवाद” हा विशेष प्रोत्साहनपर उपक्रम सुरू करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्ष वीरधवल जगदाळे पुढे म्हणाले, "या अभिनव उपक्रमांतर्गत दर महिन्यातील दोन दिवस जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसोबत थेट संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रत्येक तालुक्यातून सन २०२५-२६ या वर्षात् उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व चालू वर्षात अभियानात सहभागी एका ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अथवा सदस्य यांना सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती, प्रत्येक पंचायत समितीचे एक सभापती, जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद पदाधिकारी व दोन जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत अधिकारी, स्वयंसेवी संस्था (NGO) प्रतिनिधी, महिला बचतगट ग्रामसंघ अध्यक्ष तसेच Smart School शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनाही या उपक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे."
या उपक्रमामध्ये सहभागी प्रतिनिधींना अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कार्याचा अनुभव कथन करण्याची, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करण्याची, ग्रामविकासाच्या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांची माहिती मांडण्याची व अभियानाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी, समस्या व प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबत थेट जिल्हा परषिदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय या संवादातून ग्रामपंचायतींना आवश्यक ते मार्गदर्शन, सूचना व प्रोत्साहन मिळणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचे अनुभव इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. तसेच ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, प्रशासन व सामाजिक घटक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होऊन अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीस मोठ्या प्रमाणात बळकटी मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा, नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा, समस्या निराकरणासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीस गती देणारा उपक्रम ठरणार आहे. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात अधिक गुणवत्तावृद्धी होऊन राज्यातील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी निश्चितच बळ मिळणार असल्याचा विश्वासही अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केला आहे.
