Drought declared in 265 talukas of Maharashtra :  महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश! 

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर, भोर, वेल्हे, खेड, आंबेगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजना करणार : मावळ, मुळशी, हवेली, जुन्नर वगळले

Drought declared in 265 talukas of Maharashtra :  महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ सप्टेंबर  २०२६ :- राज्य सरकारने शनिवारी (दि.२६ सप्टेंबर) महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे आता या तालुक्यांमध्ये यंदाच्या (२०२६) खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि दुष्काळी निकषांच्या आधारे दुष्काळी उपाययोजना लागू केल्या जाणार असल्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. 

दरम्यान, यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर, भोर, वेल्हे, खेड आणि आंबेगाव या आठ तालुक्यांचा समावेश असून मावळ, मुळशी, हवेली आणि जुन्नर हे चार तालुके वगळण्यात आले आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील पावसाची स्थिती आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनात वरील सर्व तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत शनिवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. यानुसार दुष्काळी उपाययोजना लागू झालेल्या संबंधित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित केले जाणार आहेत. त्याआधारे पिकांच्या परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत मात्र विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतरच दिली जाणार आहे. 

दुष्काळ तालुक्यातील  उपाययोजना 

- जमीन महसुलात सूट मिळणार 

- पिक कर्जाचे पुनर्गठन होणार 

-  शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती 

- कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट 

-  शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी मिळणार 

- रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करणार 

-  आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार 
 
- पिकांच्या स्थितीचे पंचनामे होणार

- शेतीपंपांची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही. 

- शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार 

- जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून दिला जाणार 

- जलसंधारणाची कामे सुरू करण्यात येणार 

- पिण्यासाठी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणार 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - सुनेत्रा पवार 

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. खरीप हंगामातील परिस्थिती लक्षात घेऊन २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असल्याचे  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.