Police Vighnaharta Trust : पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत विघ्नहर्ता न्यासची अहोरात्र वैद्यकीय सेवा, ५९७ गणेशभक्तांवर उपचार!
पुणे पोलिसांचा उपक्रम : न्यासाचे विश्वस्त व मुख्य समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांची माहिती
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ सप्टेंबर २०२६ :- पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध विसर्जन मार्गांवर अहोरात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बजावण्यात आली. या उपक्रमाचे यंदा सलग २१ वे वर्ष आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे वैद्यकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. त्यामुळे एकूण ५९७ गणेशभक्त, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक आणि मिरवणुकीतील सहभागींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या न्यासाचे अध्यक्ष तथा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि न्यासाचे विश्वस्त व वैद्यकीय सेवा समन्वयक प्रमुख डॉ. मिलिंद भोई यांनी ही माहिती दिली. शहरातील बेलबाग चौक, गोखले हॉल, नारायण पेठ पोलीस चौकी आणि एस.पी. कॉलेज चौक या प्रमुख ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. त्याचबरोबर सुसज्ज रुग्णवाहिकाही दिवसरात्र कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या.
उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशन), रक्तदाब कमी होणे, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण घटणे, गर्दीमुळे श्वसनास त्रास होणे, फिट येणे, दम लागणे, मोठ्या आवाजामुळे चक्कर येणे, लहान मुलांना कानदुखी, तीव्र प्रकाशझोतामुळे डोळ्यांना होणारा त्रास, ज्येष्ठ नागरिकांना दम लागणे व खोकला आदी विविध तक्रारींच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ४२ रुग्णांना गंभीर लक्षणांमुळे आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासल्याचे डॉ. मिलिंद भोई यांनी यावेळी सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांसह पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक व ढोल-ताशा पथकातील युवक-युवतींनीही या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे अध्यक्ष तथा पोलिस आयुक्त अमितेश कुमार व सचिव तथा पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा राबविण्यात आली.
वैद्यकीय सेवा समन्वयक प्रमुख तथा विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्या नेतृत्वाखाली शेठ ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय यांची पथके व विविध रुग्णवाहिका सेवांचे कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. ओम ॲम्बुलन्स, जीवनरक्षा ॲम्बुलन्स आणि लाईफलिंक ॲम्बुलन्सच्या माध्यमातूनही आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. नंदकिशोर बोरसे, डॉ. नितीन नलावडे, डॉ. स्वाती वाघमारे, डॉ. नितीन बोरा, डॉ. उदय झेंडे यांच्यासह विविध वैद्यकीय कर्मचारी, समन्वयक आणि एकूण १५२ स्वयंसेवकांनी या सेवेत सहभाग घेतला.
दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाढती गर्दी लक्षात घेऊन वैद्यकीय पथकांनी सज्ज राहून तातडीने उपचार उपलब्ध करून दिल्याने अनेकांना मिरवणुकीच्या ठिकाणीच प्राथमिक वैद्यकीय मदत मिळाली.
