Ex zp member Aasha Buchke passes away : पुणे जिल्हा परिषदेतील 'रणरागिणी' आशा बुचके काळाच्या पडद्याआड!
जुन्नर तालुक्यातील भाजपची 'आशा' मावळली : त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ५ वाजता जुन्नरमध्ये होणार अंत्यसंस्कार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ सप्टेंबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेत सलग १५ वर्ष तत्कालीन एकसंध शिवसेनेच्या गटनेतेपदी आणि त्यानंतर काही काळ भाजपच्या गटनेतेपदी काम केलेल्या आणि जिल्हा परिषदेत सलग २० वर्षे सदस्य राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आशाताई बुचके यांचे रविवारी (दि.१३ सप्टेंबर) पहाटे अल्प आजाराने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यातील भाजपची 'आशा' मावळली आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी पाच वाजता जुन्नर तालुक्यातील वैष्णव धाम येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून केली होती. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव -वारूळवाडी जिल्हा परिषद गटातून त्या पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर दर पाच वर्षांनी जिल्हा परिषद गट बदलला तरी, कधी स्वतःच्या तर, कधी शेजारच्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरत सलग चार निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. पुणे जिल्हा परिषदेतील २० वर्षाच्या कार्यकाळापैकी सलग १५ वर्ष त्या जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या होत्या. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली. दि. २० मार्च २०२२ पर्यंत या पदावर त्या कार्यरत होत्या. पुढे चार वर्षे प्रशासकराज होते. मात्र प्रशासकराज संपल्यानंतर सन २०२६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही त्या उतरल्या होत्या. परंतू, या निवडणुकीत एका शिष्यांकडूनच त्यांना पराभव पत्करावा लागला.
आशा बुचके या जुन्नर तालुक्यातील लढाऊ नेत्या म्हणून परिचित होत्या. ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, रस्ते आणि विकासाच्या कामांसाठी त्या प्रशासनाशी आक्रमकपणे लढा देत असत्. त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी त्या सदैव तत्पर असत. त्यांच्या जाण्याने जुन्नर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना रक्तदाब, मधुमेहाचा आजार होता. जिल्हा परिषद सभागृहातील त्यांच्या स्पष्ट आणि आक्रमक भूमिका अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या होत्या. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना त्या केवळ सभागृहापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातूनही त्यांनी आवाज उठविला.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी सन २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला नसला तरी मतदारसंघातील त्यांची राजकीय उपस्थिती सातत्याने चर्चेत राहिली.
दरम्यान, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी सन २०२१ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर जुन्नर तालुक्यात भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यामुळे जुन्नरमध्ये भाजपच्या राजकीय वाटचालीत आशा बुचके यांचे नाव महत्त्वाचं मानलं जाऊ लागले. मात्र, पुढे सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना ९ हजार ४३५ मते मिळाली.
पुणे जिल्ह्यातील आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख
पुणे जिल्ह्यातील आक्रमक महिला नेत्या म्हणून आशा बुचके यांची विशेष ओळख होती. त्यांनी विविध प्रश्नांवर त आंदोलनं आणि निदर्शने केली. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे त्यांची केवळ जुन्नर तालुक्यापुरतीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांची ‘रणरागिणी’ अशी ओळख निर्माण झाली होती. विशेषतः जिल्हा परिषदेत काम करताना अधिकाऱ्यांच्या कारभारावर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका अनेकदा चर्चेत राहिल्या. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर थेट आवाज उठविणारी नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
