PMC Election 2026 : पुणे जिल्हा परिषदेचे चार माजी सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात!

हवेली पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापतींचा आणि दोन माजी सरपंचांचाही समावेश 

PMC Election 2026 : पुणे जिल्हा परिषदेचे चार माजी सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात!
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेचे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलेले माजी सदस्य, माजी सभापती, उपसभापती आणि सरपंच.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३ जानेवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे चार माजी सदस्य, हवेली पंचायत समितीचे एक माजी सभापती, एक माजी उपसभापती आणि हवेली तालुक्यातील दोन माजी सरपंच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व माजी सदस्यांचे गट, गण आणि सरपंचांची गावे ही पुर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत होती. परंतू ही सर्व गावे आता महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. 

पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चार माजी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रामदास दाभाडे (वाघोली), स्वाती टकले (उंड्री), अनिता इंगळे (कोंढवे-धावडे), जयश्री भूमकर (धायरी) आदींचा समावेश आहे. याशिवाय हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे (वाघोली), माजी उपसभापती बंडू खांदवे (लोहगाव), हवेली तालुक्यातील पिसोळी गावच्या तत्कालीन सरपंच स्नेहल दगडे आणि गुजर-निंबाळकरवाडीचे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे आदी पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे हे सन २००७ ते २०१२, स्वाती टकले या सन २०१२ ते २०१७ आणि अनिता इंगळे व जयश्री भूमकर या सन २०१७-२०२२ या कालावधीत पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. या चारपैकी दाभाडे व भूमकर यांना भाजपने, स्वाती टकले यांना शिवसेनेने तर, इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने उमेदवारी दिली आहे. 

हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे आणि माजी उपसभापती बंडू खांदवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी सरपंच स्नेहल दगडे आणि व्यंकोजी खोपडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. हे सर्वजण अनुक्रमे प्रभाग क्रमांक ०३, ०४, ३३, ३४, ३८ आणि ४१ मधून निवडणूक लढवत आहेत. यापैकी भाजपचे रामदास दाभाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू खांदवे, शिवसेनेच्या स्वाती टकले आणि भाजपच्या स्नेहल दगडे यांच्यात लढत होत आहे. 

दोन माजी सदस्यांचे नातेवाईक पालिका निवडणूक रिंगणात 

दरम्यान, याशिवाय दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांचे जवळचे नातेवाईक महापालिका निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये माजी सदस्या अर्चना कटके आणि वंदना कोद्रे या दोन माजी सदस्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.