Former central minister Suresh kalmadi passes away: माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन!
वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ जानेवारी २०२६ :- माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि. ६ जानेवारी) निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या मागे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सुरेश कलमाडी हे गेल्या काही वर्षांपासून आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पुण्याचा 'सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी' अशी टॅगलाईन त्यांनी आयुष्यभर मिरवली.
दरम्यान, सुरेश कलमाडी यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सन १९६० मध्ये कलमाडी यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेतला व सन १९६४ मध्ये ते हवाई दलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जोधपूरमधील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले होते. सन १९५४ ते १९७२ या सहा वर्षांच्या कालावधीत सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे.
राजकारणात प्रवेश
सन १९७८ मध्ये सुरेश कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश केले. याच वर्षी ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. सन १९८२ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी कलमाडी यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा पुण्याचे खासदार झाले.त्यानंतर पुढे सलग ३० वर्षे ते खासदार होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात कलमाडी रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत होते.
कलमाडी म्हणजेच पुणे
दरम्यान, एक काळ सुरेश कलमाडी म्हणजेच पुणे असा होता होता. जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण होते. पुणे महापालिका ही कलमाडी गटाच्या ताब्यात होती. एवढेच नव्हे तर, तेव्हा पुण्यात निर्णयसुद्धा पुण्यातील कलमाडी हाऊसमधूनच होत असत. कॉंग्रेसचे कार्यकर्ते या कलमाडी हाऊसमध्ये जमत असत. आपल्या केबिनमध्ये बसूनच कलमाडी सत्तेची सूत्रे हलवत असत. तेथूनच पदांचे वाटप होत असे, असा हा काळ होता. पुणे फेस्टिव्हल आणि इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा कलमाडी यांनीच सुरू केल्या आहेत.
सन २०१० नंतर राजकीय कारकीर्दीला उतरती कळा
सन २०१० पासून सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा सुरू झाली. कारण याच वर्षी त्यांच्यावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणाचा आरोप करण्यात झाला होता. यावेळी विरोधकांनी सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना सुमारे वर्षभर तुरुंगवासही भोगावा लागला होता.
