Material testing lab demand: पुणे जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाची विकासकामे रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधकाम साहित्याच्या चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारावी!

पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे मागणी

Material testing lab demand: पुणे जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाची विकासकामे रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधकाम साहित्याच्या चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारावी!
पुणे:- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याशी चर्चा करताना पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले व संघटनेचे अन्य पदाधिकारी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६  :- पुणे जिल्हा परिषदेमार्फत विविध विकासकामे करण्यात येत आहेत.मात्र काही ठेकेदारांकडून या विकास कामांसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा संशय पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने व्यक्त केला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विविध विकासकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या चाचणीसाठी स्वतःची स्वतंत्र प्रयोगशाळा ( Material Testing Lab  उभारावी, अशी मागणी पुणे जिल्हा काँट्रॅक्टर्स असोसिएशनने जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे केली आहे. 

या मागणीसाठी पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि यासंदर्भात अध्यक्ष जगदाळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. 

सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू असून कामांचा दर्जा उंचविण्यासाठी हे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कंत्राटदाराना सध्या इतर प्रयोगशाळेत साहित्य चाचणीसाठी द्यावे लागते. तसेच काही चाचण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदारांची कसरत होते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी प्रयोगशाळेची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी  सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जिल्हा परिषदेच्या पुढच्या बैठकीमध्ये हा विषय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे रविंद्र भोसले यांनी सांगितले.