National Engineers Day : राष्ट्रीय अभियंता दिन विशेष लेख : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या : प्रयत्नाने श्रेष्ठ ठरलेला अभियंता! 

आधुनिक भारताच्या अभियांत्रिकी आणि औद्योगिक विकासाचा पाया घालणाऱ्या महान अभियंत्याच्या कार्यकर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप

National Engineers Day : राष्ट्रीय अभियंता दिन विशेष लेख : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या : प्रयत्नाने श्रेष्ठ ठरलेला अभियंता! 
पुणे:- सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया आणि लेखक इंजि. रवींद्र भोसले.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन हा दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा उत्कृष्ट पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कामगिरीवर टाकलेला हा प्रकाशझोत. 

- इंजि. रवींद्र भोसले
अध्यक्ष, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन. 


सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दि. १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील मुद्देनाहळ्ळी येथे झाला. भारताच्या उभारणीत आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे त्यांचा जन्मदिन देशभर ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही अभियंते आणि युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

विश्वेश्वरय्या यांच्या पूर्वजांचे गाव आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम होते. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षणासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. विद्यार्थिदशेत त्यांनी शिकवण्या करून शाळेची फी भागवली. मात्र आर्थिक अडचणींनी त्यांच्या शिक्षणाची वाट रोखली नाही. १८८० मध्ये बी.ए.ची पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना म्हैसूर संस्थानाची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर पुण्याच्या तत्कालीन सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी अडीच वर्षांत पूर्ण केला आणि नोव्हेंबर १८८३ मध्ये एल.सी.ई. (Licentiate in Civil Engineering) ही पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने मिळवली. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि परिश्रमाची ही सुरुवातीचीच प्रचिती होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या पाटबंधारे विभागात त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनिअर म्हणून पुण्यात त्यांनी काम केले. सरकारी सेवेत असताना त्यांनी पाणीपुरवठा, सिंचन, पूरनियंत्रण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. सन १८९३ मध्ये सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यांनी अभिनव पद्धतीने सोडवला. यासाठी त्यांनी सिंधू नदीतून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी आखली. 

त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या एडनमधील मोठ्या सैनिकी छावणीसमोरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्यांनी एडनजवळील परिसरातून पावसाचे पाणी साठवून पुरवठा करण्याची योजना तयार केली. या कामामुळे त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची व्यापक दखल घेण्यात आली. त्या काळात शेतीसाठी कालव्याच्या पाण्याचा अनियंत्रित वापर होत असे. त्यावर उपाय म्हणून विश्वेश्वरय्या यांनी अभ्यास करून ‘ब्लॉक सिस्टिम’ ही पद्धत विकसित केली. सुरुवातीला या पद्धतीला विरोध झाला.  मात्र तिचे फायदे शेतकऱ्यांना समजल्यानंतर हा विरोध कमी झाला.

सर विश्वेश्वरय्या यांचे पुण्याशी नाते 

सर विश्वेश्वरय्या यांचे पुण्याशीही अत्यंत महत्त्वाचे नाते होते. कारण सरकारी सेवेमुळे त्यांनी पुण्यात सुमारे चौदा-पंधरा वर्षे वास्तव्य केले. खडकवासला धरणासाठी जलाशयातील पाणी ठराविक पातळीवर पोहोचल्यावर आपोआप उघडणारे आणि पाणी कमी झाल्यावर बंद होणारे स्वयंचलित दरवाजे तयार करण्याच्या तंत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पुणे शहराच्या भूमिगत सांडपाणी निःसारणाच्या योजनेतही त्यांनी काम केले. पुणे परिसरातील शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्यांनी ब्लॉक सिस्टिमचा आग्रह धरला.

पुण्यातील वास्तव्यात त्यांना लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे आणि साहित्यसम्राट केळकर यांसारख्या अनेक विद्वान व देशप्रेमी व्यक्तींचा सहवास लाभला. सरकारी सेवेत असताना त्यांनी असामान्य कर्तृत्व दाखवले. मात्र त्या काळातील ब्रिटिश प्रशासनात भारतीयांना वरिष्ठ पदांपासून दूर ठेवले जात होते. चीफ इंजिनिअर पदाबाबत आलेल्या अनुभवामुळे त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीला धक्का बसला. त्यामुळे सन १९०८ मध्ये त्यांनी सुपरिटेंडेंट इंजिनिअर पदाचा राजीनामा दिला. पेन्शनचा हक्क गमावण्याची शक्यता असूनही त्यांनी हा निर्णय घेतला. परंतू,  त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने विशेष परवानगी मिळवून त्यांना पेन्शनचा लाभ दिला.

म्हैसूर संस्थानांत चीफ इंजिनिअर 

त्यानंतर हैदराबाद संस्थानने त्यांना आमंत्रित केले. त्या काळात हैदराबाद परिसरातील मूसी आणि ईसी नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत असे. विश्वेश्वरय्या यांनी पूर नियंत्रणासाठी धरणांची योजना आखली. ही समस्या सोडविल्यानंतर १९०९ मध्ये ते म्हैसूर संस्थानाचे चीफ इंजिनिअर म्हणून रुजू झाले. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीची दखल घेतली. सन १९१२ मध्ये त्यांची म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात म्हैसूरच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत विकासाला मोठी गती मिळाली.

भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्ससारखे उद्योग उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. रेल्वे व्यवस्था सुधारली, बँक ऑफ म्हैसूरची स्थापना करण्यात आली, शिक्षणाचा विस्तार करण्यात आला आणि शेती, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाला चालना देण्यात आली. कृष्णराजसागर धरणाचे काम पूर्ण करून सिंचन आणि पाणीपुरवठ्याला मोठी मदत केली, तसेच वृंदावन उद्यानाच्या निर्मितीतही त्यांचे योगदान राहिले. म्हैसूर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले.विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, स्वाभिमान, बुद्धिमत्ता, अखंड वाचन, चिंतन, संशोधन आणि कार्यनिष्ठा यांचा सुंदर संगम होता. ते त्यांच्या नेटक्या पोशाखासाठीही ते प्रसिद्ध होते. ते केवळ जन्माने मोठे नव्हते, तर प्रयत्न, परिश्रम आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ झाले.

ब्रिटिश सरकारकडून 'सर' पदवी 

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’, ‘कैसर-ए-हिंद’, ‘K.C.I.E.’ आणि ‘C.I.E.’ यांसारखे सन्मान दिले. भारत सरकारने दि. ७ सप्टेंबर १९५५ रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला. अनेक विद्यापीठांनीही त्यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरविले. विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंते नव्हते.  

सर विश्वेश्वरय्या यांची ग्रंथसंपदा 

ते लेखक आणि विचारवंतही होते. त्यांनी Vision of Prosperous Mysore,  Reconstructing India, Unemployment in India – Causes and Cure, Planned Economy of India, Nation Building, Prosperity Through Industry, Memories of My Working Life यांसह औद्योगिक विकास, ग्रामीण औद्योगिकीकरण, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. 

युवा पिढीसाठी सर विश्वेश्वरय्या यांचा संदेश 

युवा पिढीसाठी त्यांचा संदेश अत्यंत प्रेरणादायी होता. तो म्हणजे 'It is better to wear out than rust out.' हा होय. म्हणजे  'झिजलात तरी चालेल, पण गंजू नका.' गंज चढलेल्या आयुष्यापेक्षा समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी झिजलेले आयुष्य अधिक मोलाचे आहे, हा संदेश त्यांनी दिला. त्यांचा हा संदेश त्यांच्या  संपूर्ण जीवनातूनही दिसून येतो.

अशा या महान अभियंत्याचे दि. १४ एप्रिल १९६२ रोजी बंगळुरू येथे, वयाच्या १०१व्या वर्षी निधन झाले. अभियांत्रिकी, उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श आजही भारताच्या विकासयात्रेला प्रेरणा देत आहे.