देशातील होमलोनधारकांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा, गृहकर्जाचा दरमहा हप्ता होणार आता कमी!
रिझर्व्ह बँकेकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्क्याची कपात : नवीन गृहकर्ज घेणे होणार स्वस्त

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० एप्रिल २०२५ :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आयात कराच्या वाढीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बुधवारी (दि. ९ एप्रिल २०२५) सलग दुसऱ्यांदा व्याजदरात (रेपो रेट) पाव (०.२५ टक्के) कपात केली आहे. यामुळे गृहकर्जधारकांना (होमलोनधारक) दिलासा मिळणार आहे. या रेपो रेट कपातीमुळे आता गृहकर्जदारांचा कर्जाचा दरमहा हप्ता आता कमी होणार आहे. याशिवाय नवीन गृहकर्ज घेणेही आता सध्याच्या तुलनेत स्वस्त होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये (व्याजदर) कपात केल्याने आता रेपो रेट हा ६ टक्के झाला आहे. याशिवाय भविष्यात आणखी रेपो रेट कमी करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यामुळे बँकांमधून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय होम लोन व कार लोनचे दरमहा हप्तेसुद्धा (ईएमआय) कमी होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने धोरणात्मक दृष्टीकोनांमध्ये बदल करून आगामी काळात आणखी व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. यातून सर्वसामान्यांवरील गृहकर्जाच्या हप्त्याचा भार प्रत्यक्षात कमी होईल, हे कटाक्षाने पाहिले जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
मल्होत्रा म्हणाले, "अमेरिकेने जाहीर केलेल्या करांचा अन्य देशांसाठीचा परिणाम हा त्यांच्या परिस्थितीनुसार वेगळा असेल. भारतासाठी परिणामांचे मोजमाप करणे तुर्त अवघड असले तरी आम्ही आमचे मूल्यांकन स्पष्ट केले आहे."
आर्थिक वृद्धी दराचा अंदाज ६.५ टक्क्यांवर
रिझर्व्ह बँकेने सन २०२५ २६ या आर्थिक वर्षासाठी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज हा ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. तसेच महागाईचा अंदाजही ४.२ टक्क्यांवरून ४ टक्क्यांपर्यंत कमी केला असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत असा बदलत गेला रेपो रेट (टक्केवारीत)
दिनांक ९ एप्रिल २०२५ --- ६.००
दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ ---- ६.२५
दिनांक ८ जून २०२३--- ६.५०
दिनांक ७ डिसेंबर २०२२ --- ६.२५
दिनांक ३० सप्टेबर २०२२ --- ५.९०
दिनांक ५ ऑगस्ट २०२२ ---- ५.४०
दिनांक ८ जून २०२२ ---- ४.९०
दिनांक ४ मे २०२२ ---- ४.४०
दिनांक २२ मे २०२२ --- ४.००
दिनांक ६ फेब्रुवारी २०२० --- ५.१५