Prisoners made Ganesha idols : ज्या हातांनी चूक केली, त्याच हातांनी घडतोय बाप्पा!
येरवडा कारागृहातील कैद्यांच्या हातातून साकारतायत गणेश मूर्ती : प्रेरणापथ प्रकल्पांतर्गत उपक्रम
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- रागाच्या भरात नकळत झालेल्या चुकीची शिक्षा भोगताना आता, त्याच हातांना कलेची दिशा मिळाली आहे. कारागृहाच्या भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या हातून यंदा साक्षात विघ्नहर्ता गणेश साकारला आहे. व्यावसायिक कलाकारांनाही लाजवेल, अशा गणेश मूर्ती या कैद्यांच्या हातून निर्माण झाल्या आहेत. कैद्यांची ही कलाकृती व या कलाकृतींसाठी राबविण्यात येत असलेला प्रेरणापथ हा अनोखा उपक्रम म्हणजे प्रायश्चित्तातून परिवर्तन आणि परिवर्तनातून समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनरागमनाचा अनोखा प्रयत्न ठरत आहे.
महाराष्ट्र कारागृह प्रशासन, पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील अनेक वर्षांपासून कैद्यांसाठी ‘प्रेरणापथ’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत कैद्यांमधील चांगला माणूस जागृत व्हावा व त्यांना कौशल्याची नवी दिशा मिळावी आणि त्यांना आत्मविश्वासाने पुन्हा समाजात उभे राहता यावे, या उद्देशाने गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, पुंडलिक खलोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कैद्यांना मूर्तीकलेचे मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रशिक्षणही दिले असून यामुळे कैद्यांच्या हातून आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे या मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीपासून तयार करण्यात आल्या आहेत.या मूर्ती आता नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या मूर्ती पुणे शहरातील गायत्री क्लिनिक, खडक माळ, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रोड येथे स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या गणेश मूर्ती पुणेकरांनी भक्तिभावाने खरेदी करून आपापल्या घरात प्रतिष्ठापना करावी,असे आवाहन कारागृह सुधार सेवा विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ.सुहास वारके, पोलिस महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ आणि अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम यांनी केले आहे.
या मूर्ती केवळ मातीपासून घडलेल्या नसून त्या प्रायश्चित्त, परिवर्तन आणि नव्या आयुष्याची आशा घेऊन साकारल्या आहेत.
- डॉ. मिलिंद भोई,
अध्यक्ष, भोई प्रतिष्ठान,
पुणे.
