Dy. CM Ajit Pawar Passes away : धक्कादायक : महाराष्ट्राचे 'दादा' गेले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन!
महाराष्ट्रावर शोककळा : राज्य सरकारकडून बुधवारी सरकारी सुट्टी आणि तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे/बारामती:- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे व बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८ जानेवारी २०२६) सकाळी ८.४८ वाजता पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या अपघातामध्ये महाराष्ट्राचे 'दादा' यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक धडाकेबाज नेता गमावला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने बुधवारी सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. तीन दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी एका खासगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे येत होते. हे विमान बारामती विमानतळावरील धावपट्टीजवळ लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. हे खासगी विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार सकाळी सुमारे ८ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास हे विमान लँडिंगच्या प्रयत्नात धावपट्टीच्या बाजूला घसरले आणि स्फोटासह जळून खाक झाले. या अपघाताच्या वेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि वैमानिक विमानात होते. या सर्व जणांचा मृत्यू झाला आहे. पवार यांच्या मागे आई, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, पार्थ व जय ही दोन मुले असा परिवार आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित बारामतीत सभांसाठी अजित पवार हे बारामतीला येत होते. या अपघातानंतर बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. शिवाय राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. ६६ वर्षीय अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि अनुभवी नेते होते. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सहकार क्षेत्रातून सुरू करून बारामती विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार निर्माण केला होता. महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे नेते म्हणून ओळखले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
