Indapur NCP' Protest March : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा!
इंदापूर तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत केला निषेध
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि.७ ऑगस्ट २०२६ :- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि.७ ऑगस्ट) इंदापूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी इंदापूर तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत सपकाळ यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले आणि इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, पंचायत समितीचे गटनेते बापूराव शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील महिलांचा आणि सुनेत्रा पवार यांचा केलेला अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित आपली चूक मान्य करून सुनेत्रा पवार यांची बिनशर्त जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभरात तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आमच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि महिलांना तुच्छ लेखणारे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.
- श्रीमंत ढोले,
गटनेता,जिल्हा परिषद, पुणे.
