पुणे महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी सन २००२ चा फॉर्म्युला वापरा
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी यांची मागणी

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ मे २०२५ :- प्रशासकराज असलेल्या महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचा आदेश दिल्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत सन २००२ मधील निवडणुकीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी आणि महापालिकेची निवडणूक मुदतीत घेण्यासाठी पुणे पालिकेच्या निवडणुकीसाठी सन २००२ चा फॉर्म्युला वापरा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. ६ मे) केली आहे.
पुणे महानगरपालिकेत पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सन २०१८ मध्ये ११ आणि सन २०१९ मध्ये २३ अशी एकूण ३४ गावे समाविष्ट झालेली आहेत. याआधी पुणे महापालिकेची प्रभाग रचना सन २०१७ मध्ये झालेली आहे. त्यामुळे पालिकेतील जुन्या हद्दीतील प्रभाग रचना तयार आहे. त्यातही ११ नावांपैकी २ गावे पालिका हद्दीतून वगळण्यात आलेली आहेत.त्यामुळे सध्या केवळ ३२ गावांच्या हद्दीतील प्रभाग रचना तयार करणे बाकी आहे.
सन २००२ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी आधी जुन्या हद्दीतील प्रभागांची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर महिनाभराने समाविष्ट गावांमधील हद्दीतील प्रभागांची स्वतंत्र निवडणूक घेण्यात आली होती. परंतु या दोन्ही निवडणुकीची एकाचवेळी मतमोजणी केली होती. नेमकी अशीच स्थिती यंदा निर्माण झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी सन २००२ चा फॉर्म्युला योग्य ठरणार असल्याचे मत उज्ज्वल केसकर यांनी मंगळवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या आदेशाप्रमाणे 74 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थापन झालेल्या स्वायत्त राज्य निवडणूक आयोगाला महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी लागणार आहे. यामध्ये पुणे महापालिकेचा विचार केला तर, सन 2018 मध्ये ११ गावे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली होती. त्यांची एक स्वतंत्र निवडणूक झाली होती. त्यानंतर 30 जून 2019 रोजी पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणखी 23 गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
सन 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घेताना, त्यानंतर समाविष्ट झालेल्या ११ गावांमधून २ गावे वगळले आहेत. म्हणजे सध्या 9 आणि 23 अशा एकूण ३२ गावांची वेगळी प्रभाग रचना लगेच करणे शक्य आहे. सन 2002 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यावेळी जुन्या हद्दीची प्रभाग रचना करून त्याची निवडणूक घेण्यात आली होती आणि त्यानंतर एक महिन्याने समाविष्ट 23 गावांची निवडणूक वेगळे प्रभाग करून झाली आणि दोन्ही निवडणुकींचा निकाल एकत्र जाहीर केला होता. यावेळेला देखील हे करणे शक्य आहे. त्यामुळे याबाबत एक कृती आराखडा तयार येत्या दोन दिवसात राज्य निवडणूक आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सादर करणार असल्याचे उज्ज्वल केसकर यांनी म्हटले आहे.
'आमच्या हस्तक्षेप याचिकेवर उच्च न्यायालयाचाही असाच आदेश होता'
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्याव्यात, असा आदेश आज (मंगळवारी) दिला आहे. आम्ही याबाबत दाखल केलेल्या एका याचिकेवर दि. 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.अजय खानविलकर यांच्या खंडपीठानेसुद्धा असाच आदेश दिला होता. यामध्ये त्यांनी दि. 11 मार्च 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेवर पंधरा दिवसांमध्ये निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेशात म्हटले होते.तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे ई-मेल पाठवून निवडणुका न घेणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे,असे सांगितले होते.नवीन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आयुक्त म्हणून सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनादेखील आम्ही ई-मेलद्वारे या निर्णयाची जाणीव करून दिली होती, असे पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी म्हटले आहे.
आता कोणत्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधींची महानगरपालिका असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि राज्य निवडणूक आयोगाने उर्वरित गावांची त्वरित प्रभाग रचना सुरू करावी आणि त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करावे अशी आमची मागणीवजा सूचना आहे.
- उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते, पुणे महानगरपालिका