Pune zp Livestock Prosperity Training Scheme : पुणे जिल्ह्यातील पशुपालकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेची 'लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्ध प्रशिक्षण योजना सुरु! 

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांची माहिती : सर्व तालुक्यात प्रत्येकी एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार

Pune zp Livestock Prosperity Training Scheme : पुणे जिल्ह्यातील पशुपालकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेची 'लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्ध प्रशिक्षण योजना सुरु! 
पुणे :- पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्हा पशुपालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. या प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेला 'लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण योजना असे नाव देण्यात आले असल्याचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या योजनेची चालू आर्थिक वर्षापासून (सन २०२६-२०२७) अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना उच्च दर्जाचे व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल व प्रशिक्षित बनविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात पशुपालन व्यवसाय अधिक उत्पादनक्षम,शाश्वत व नफ्याचा कसा होईल, यावर विशेष भर दिला जाणार आहे.

पुणे  जिल्ह्यातील पशुपालकांना सक्षम करून त्यांच्यातून पशु उद्योजक घडविणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. यानुसार या योजनेंतर्गत कुक्कुटपालन, शेळी व मेंढी पालन, दुग्धव्यवसाय, चारा निर्मिती आदी विषयांचे प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी, पशुपालन करणारे व्यक्ती किंवा पशुपालनाचा व्यवसाय करु इच्छित असलेल्या पुणे जिल्ह्यातील रहिवासी पशुपालक, शेतकरी, महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपला व्यवसाय अधिक प्रगत आणि फायदेशीर बनवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी केले आहे.