Veteran freedom fighter Abasaheb Kolpe passes away : मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब कोळपे यांचे वृद्धापकाळाने निधन!
हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी सोमवारी सायंकाळी आबासाहेब कोळपे यांना अखेरचा निरोप
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ :- मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील चिंचाळा (ता. वडवणी) येथील रहिवासी आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब तात्याबा कोळपे यांचे सोमवारी (दि.१० ऑगस्ट) दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी सहा वाजता चिंचाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गणपत कोळपे हे त्यांचे पूत्र होत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान, सात वर्षांपुर्वी आबासाहेब कोळपे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते मनाने खचले होते.
तत्कालीन माजलगाव (सध्या वडवणी) तालुक्यातील चिंचाळा येथे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले आबासाहेब कोळपे यांनी ऐन तारुण्यात असतानाच स्वतःला मराठवाडा मुक्ती संग्रामात झोकून घेतले होते. या मुक्ती संग्रामाच्या लढ्यात कोळपे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनानी स्व. गोविंदभाई श्रॉफ, स्व. काशीनाथराव जाधव, बीडचे माजी खासदार आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.रामराव आवरगावकर, कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या समवेत मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून दिले होते.
क्रांतीसिंह नाना पाटील (पत्री सरकार) यांचे खंदे समर्थक
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व पत्री सरकार म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी काही काळ बीडचे खासदार म्हणून काम केले. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रचारात आणि त्यांच्या विजयात आबासाहेब कोळपे यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्याकाळी कोळपे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे खंदे समर्थक व जीवलग मित्र म्हणून ओळखले जात असत.
पीएसआय बनून चार रझाकारांचा खात्मा
चिंचाळा येथील स्व. सुखदेव कोळपे, बाबुराव मुळे, रामकृष्ण खटावकर यांच्यासह आणखी पाच ते सहा जण मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यातील पाथरवाला बुद्रुक (ता. अंबड) येथील चार रझाकारांनी खुप उन्माद सुरू केला होता. हे चारही जण सख्खे भाऊ होते. हे चार रझाकार सर्वसामान्यांवर अन्ववित अत्याचार करु लागल्याचे कळताच आबासाहेब कोळपे, स्व. सुखदेव कोळपे यांनी पुढाकार या चार रझाकारांना कायमस्वरूपी धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. यानुसार आबासाहेब कोळपे हे पोलिस उपनिरीक्षक बनले आणि अन्य सहकारी हे पोलिस शिपाई बनले. यासाठी या सर्वांनी पोलिस उपनिरीक्षक व पोलिसांचा गणवेश आणि बंदुका मिळवण्यासाठी पहिल्यांदा पाटोदा तालुक्यातील एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यानंतर या सर्वांनी मिळून पाथरवाला बुद्रुक हे गाव गाठले आणि तेथील चार रझाकारांचा खात्मा केला होता.
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्याकडून गौरव
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सन १९६५ च्या सुमारास महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी स्व. आबासाहेब कोळपे यांचा खास सत्कार केला होता. त्यानंतर सन २०२३ मध्ये झालेल्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आबासाहेब कोळपे यांचा गौरव करण्यात आला होता.
