Pwd news : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थापत्य कौशल्य वाखाणण्याजोगे, महाराजांचा आदर्श सर्वांनी घ्यावा
पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे रवींद्र भोसले यांचे आवाहन: सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शिवजयंती साजरी
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ फेब्रुवारी २०२५ :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी गडकिल्ल्यांचे उत्कृष्ट बांधकाम केले. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापत्य कौशल्य दिसून येते. तसेच महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेत रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा हा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करणे आवश्यक आहे, असे मत पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी भोसले बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे,उज्वला घावटे, अनुराधा भंडारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कोणत्याही चांगल्या प्रकल्पाचे काम करत असताना शिवरायांचे विचार आपल्याला प्रेरणा देत असतात, असे कार्यकारी अभियंता उज्वला घावटे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन अनिल बडे, अनिल काकडे आणि नितीन सैंदाने यांनी केले.
