Notes of patriotism echoed in Pune's Yerwada Jail : पुणे येथील येरवडा कारागृहात घुमले देशभक्तीचे सूर! 

ए मेरे प्यारे वतन' या संगीतमय मैफिलीचे आयोजन : कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत 'प्रेरणापथ'  प्रकल्पांतर्गत कलागुणांना प्रोत्साहन

Notes of patriotism echoed in Pune's Yerwada Jail : पुणे येथील येरवडा कारागृहात घुमले देशभक्तीचे सूर! 
पुणे:- येरवडा कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफिलीत सहभागी झालेले कैदी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ ऑगस्ट २०२६ :- ए मेरे वतन के लोगो.., कर चले हम फीदा.., मेरे देश की धरती.. पासून अगदी तेरी  मिट्टी मे मर जावा..., हर करम अपना  करेंगे... अश्या देशप्रेमाने भरलेल्या स्वरांनी व सुरांनी येरवडा कारागृहाच्या भिंती अक्षरश: जिवंत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यासाठी कैद्यांचा सहभाग असलेल्या 'ए मेरे प्यारे वतन' या संगीतमय मैफिलीचे निमित्त ठरले. या मैफिलीमुळे येरवडा कारागृहात देशभक्तीचे सुर उमटले. 

महाराष्ट्र कारागृह प्रशासन,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या 'प्रेरणापथ' या प्रकल्पांतर्गत कैद्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळवून त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे, या उद्देशाने या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. 

कैद्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचे चिरंजीव दीपक आनंदजी शहा आणि अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. त्यांच्यातील लपलेल्या कलागुणांना समाजासमोर आणण्यासाठी मुंबईतील आनंदी वीरजी शाह फाउंडेशनसुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीत कैद्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कारागृहातील खाकी वर्दीतील अधिकारी आणि अपर पोलिस महासंचालक डॉ. सुहास  वारके यांनासुद्धा गाण्याचा मोह आवरला नाही.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस महासंचालक डॉ.सुहास वारके यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका विशद केली. कारागृहे ही फक्त कारागृह न राहता सुधारगृहे व्हावी, या विचारातून महाराष्ट्र कारागृह प्रशासन,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही समाधानाची  गोष्ट असल्याचे सांगून राज्यातील इतर कारागृहांमध्येसुद्धा हा कार्यक्रम व हा प्रकल्प व्यापक स्वरूपात राबवण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनात महाराष्ट्र  कारागृह प्रशासन, आदर्श मित्र मंडळ,  स्वयंसेवी संस्था यांनी केलेल्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्ता गायकवाड, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, नामदेव शिंदे गुरुजी,सामाजिक कार्यकर्ते शुभम मेदनकर, चंद्रकांत दोमा, आशिष गांधी आदी उपस्थित होते.

मोहम्मद रफी आर्ट्स फाउंडेशनचे जहीर दरबार यांच्या संगीत संयोजनात बबलू रमजानी,आवेज दरबार,शाकीर शेख ,जाकीर शेख, देबजानी चक्रबोर्ती, ललिता जगदाळे, अवधूत काशीद, रशीद शेख, सागर घोडके, सोमनाथ फाटके, देवेंद्र नागटिळक  या कलाकारांनी या मैफिलीत आपली कला सादर केली. या कार्यक्रमाच्या आयोजनात तुरुंग अधिकारी आर. इ. गायकवाड, डी. जी. दुबे, एस. आर. पाटील, शिक्षक नामदेव शिंदे,सतीश कदम आदींनी  सहभाग घेतला.