Zilla Parishad, Panchayat samiti constituency reservation lottery : जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सदस्यांच्या राखीव जागा येत्या सोमवारी जाहीर होणार!
जिल्हास्तरावर झेडपी गटांची व तालुकास्तरावर पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत : पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडतीची ठिकाणे जाहीर
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा (झेडपी) व पंचायत समित्यांच्या (पी.सी.) अनुक्रमे गट व गणांच्या प्रवर्गनिहाय राखीव जागा निश्चित करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर)आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यानुसार झेडपी गटांची आरक्षण सोडत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हापातळीवर तर, पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत ही आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.
यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांची आरक्षण सोडत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील बहुउद्देशीय सभागृहात काढली जाणार आहे. पुणे शहरात मुख्यालय असलेल्या हवेली पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत पुणे शहरात तर, जिल्ह्यातील अन्य सर्व पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत ही तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
राज्यातील ३२ झेडपी आणि ३३६ पंचायत समित्यांच्या अनुक्रमे गट आणि गणांची आरक्षण सोडत येत्या सोमवारी काढली जाणार आहे.राज्यातील २६ जिल्हा परिषदा व २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांची भर पडून ही संख्या आता ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या इतकी झाली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ अनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा आयोजित करून प्रवर्गनिहाय राखीव जागा जाहीर करणे आवश्यक आहे. यानुसार या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण (खुला) गटासाठीच्या जागा जाहीर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, या सर्व प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात प्रवर्गनिहाय एकूण जागांपैकी निम्म्या जागा त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. यानुसार हे आरक्षण जाहीर केले जाणार असल्याचे पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या समन्वयक व रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीची ठिकाणे
- जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे व पुरंदर --- त्या त्या पंचायत समिती कार्यालयाचे सभागृह.
- शिरूर --- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर.
- मावळ --- भेगडे लॉन्स, वडगांव मावळ.
- हवेली --- उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी., सी. व्ही. जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे.
- दौंड --- बैठक सभागृह, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड.
- भोर --- अभिजीत मंगल कार्यालय,भोर महाड रस्ता, भोर.
- बारामती --- कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती.
- इंदापूर --- राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर.
