Hinjawadi-Maan-Marunji corporation demand : पुण्यातील हिंजवडी-माण-मारुंजी परिसराच्या विकासासाठी स्वतंत्र ‘क’ दर्जाची महानगरपालिका स्थापन करा! 

पुणे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Hinjawadi-Maan-Marunji corporation demand : पुण्यातील हिंजवडी-माण-मारुंजी परिसराच्या विकासासाठी स्वतंत्र ‘क’ दर्जाची महानगरपालिका स्थापन करा! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ६ सप्टेंबर २०२६ :- पुणे शहरालगत असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी अशी स्वतंत्र क वर्ग महानगरपालिका स्थापन करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

सध्या हिंजवडी, माण, मारुंजी आणि मुळशी तालुक्यातील वेगाने विकसित होणाऱ्या परिसरातील वाढती लोकसंख्या,आयटी क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्याप्रमाणात अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करता या भागाच्या शाश्वत विकासासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. त्यामुळे हा परिसर पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याऐवजी हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील प्रमुख मोठी गावे एकत्र करून स्वतंत्र ‘क’ दर्जाची महानगरपालिका स्थापन करणे आवश्यक असल्याचे शिवाजी बुचडे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, याच विषयासंदर्भात बुचडे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यापूर्वीच दोन बैठका घेऊन परिसरातील विविध प्रश्न आणि विकासाच्या गरजांबाबत सविस्तर चर्चा केली आहे. तसेच यासंदर्भातील पुढील बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये या परिसराच्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार असल्याचे बुचडे पाटील यांनी सांगितले. 

हिंजवडी हा परिसर जागतिक स्तरावर ओळखला जाणारा आयटी हब म्हणून विकसित झाला आहे. मात्र, या भागातील वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन आणि इतर मूलभूत नागरी सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ महापालिकेत गावांचा समावेश करून प्रश्न सुटणार नसून, स्थानिक गरजा आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक असल्याचे बुचडे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

यापूर्वी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही मूलभूत नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एखाद्या मोठ्या महापालिकेत गावांचा समावेश करण्यापेक्षा हिंजवडी परिसरातील प्रमुख गावांचा स्वतंत्र प्रशासकीय घटक निर्माण करून त्यांचा नियोजनबद्ध विकास करणे अधिक योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हिंजवडी-माण-मारुंजी परिसर हा केवळ पुणे जिल्ह्याचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. येथे आयटी उद्योग मोठ्या प्रमाणात आला आहे. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा सक्षम झाल्या पाहिजेत. स्थानिक नागरिक, आयटीयन्स आणि युवकांच्या भविष्यासाठी स्वतंत्र नियोजन आणि स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याऐवजी आमच्या परिसरातील मोठी गावे एकत्र करून स्वतंत्र ‘क’ दर्जाची महानगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी शिवाजी बुचडे पाटील यांनी केली.

या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषद, पीएमआरडीए तसेच संबंधित विविध शासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, परिसरातील पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. नागरिकांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यावर ठोस निर्णय होईपर्यंत हा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही बुचडे पाटील यांनी सांगितले.