Dr. Shrirang chorghe Passes away : तोरणा ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन डॉ. श्रीरंग चोरघे यांचे निधन!
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ हरपला : त्यांच्या पार्थिवावर राजगड तालुक्यातील वांगणीवाडी येथे अंत्यसंस्कार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्ह्यातील आधारस्तंभ आणि तोरणा ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन डॉ. श्रीरंग भिकाजी चोरघे यांचे बुधवारी (दि.१९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. डॉ. चोरगे यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता पुणे जिल्ह्यातील वांगणीवाडी (ता. राजगड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. डॉ. श्रीरंग चोरघे हे मुळचे राजगड तालुक्यातील वांगणीवाडी येथील रहिवासी होते. त्यामुळे त्यांनी या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आधी तोरणा ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची आणि त्यानंतर नवतोरणा कंपनीची स्थापना केली. ते नवतोरणा फेड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला केवळ राजगड तालुक्यापुरत्या मर्यादित असलेल्या या दोन्ही कंपन्यांचा त्यांनी नंतर राज्यभर विस्तार केला.
कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. याशिवाय त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवीही बहाल करण्यात आली होती. दरम्यान, डॉ. चोरघे यांना हजारोंच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी दहा वाजता वांगणीवाडी येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पुणे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण, पण चर्चा राहून गेली
कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीरंग चोरघे यांना चर्चेसाठी मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले होते. यानुसार दि. १६ ऑगस्ट रोजी ही चर्चा होणार होती. परंतू, दि. १५ ऑगस्ट रोजीच डॉ. चोरघे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर म्हणजेच उपचार पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. चोरघे यांच्यात चर्चा होणार होती. मात्र उपचार सुरू असतानाच अचानकपणे डॉ. चोरघे यांचे निधन झाल्यामुळे अखेर या दोघांमधील चर्चा राहून गेली.
