Farmers' financial loot from Pune market committee due to Deputy Chief Minister Ajit Pawar's Malida gang :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मलिदा गँगमुळे पुण्याच्या बाजार समितीकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट!
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ जुलै २०२५ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मलिदा गॅंगमुळे पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाऊ लागली आहे. विशेषत: प्रशासकराज काळात आणि विद्यमान संचालक मंडळाकडून या बाजार समितीत गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा उच्चांक झाला आहे. पणनमंत्री जयप्रकाश रावल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादानेच हा भ्रष्टाचार घडला असल्याचा जाहीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी बुधवारी (दि. ९ जुलै) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला. सत्ताधाऱ्यांमुळे या कारभाराची चौकशी हा केवळ एक फार्स(नाटक) ठरू नये, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा करणार असल्याचे लवांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रकरणाची माहिती देण्यासाठी लवांडे यांनी बुधवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव विक्रांत पाटील हेही उपस्थित होते. मार्केट यार्ड येथील ४ हजार तोतया विक्रेत्यांवर कारवाई करावी, विभागवार विक्रीची व्यवस्था करण्यात यावी, बोगस परवाने रोखण्यात यावेत आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यात यावा आदी मागण्या लवांडे यांनी केल्या आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, "पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समित च्या संचालक मंडळाच्या आशीर्वादाने व पणन संचालक आणि अन्य वरिष्ठांच्या खात्रीशीर पाठिंब्यामुळे या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची राजरोसपणे आर्थिक लुटमार होत आहे. यासाठी जाणीवपूर्वक म्हणून विभागवार विक्री होऊ दिली जात नाही. यासाठी अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा खुद्द अजित दादा यांचीदेखील दिशाभूल करून संचालक मंडळाने हजारो तोतया व्यावसायिकांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाजार समितीच्या आवारात आश्रय दिला आहे. विशेष म्हणजे हा अनधिकृत व्यापार हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून सुरू आहे, असे त्यांचेच बगलबच्चे सांगताना दिसत आहेत."
ज्यांचा बाजाराच्या आवारात दूर दूरपर्यंत व्यावसायिक किंवा अन्य कसलाही संबंध नाही,अशा निरनिराळ्या झोपडपट्टीतील लोकांच्या आणि अन्य ठिकाणच्या लोकांच्या नावे कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या सहा महिन्यात चार ते साडेचार हजार व्यावसायिक परवाने दिलेले आहेत. परंतु, ज्यांचा बाजाराच्या आवारात गाळा आहे. ज्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सुरू आहे, अशा आडत्यांना मात्र वर्षानुवर्षे बाजार आवारातील खरेदीचा परवाना देण्यास संचालक मंडळ व प्रशासन यांनी विलंब केला असून यामुळे बाजार आवारातील व्यवसाय दिवसेंदिवस घटत चालला असल्याचा आरोपही लवांडे यांनी यावेळी केला.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड हे चरस,अफू, गांजा यासारखे व अन्य अंमली पदार्थ मिळण्याचे एक खात्रीशीर ठिकाण बनले आहे. सर्व अंमली पदार्थ वितरित करण्यासाठी संचालक मंडळांनी स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना बाजाराच्या आवारात निरनिराळ्या टपऱ्या देऊ केल्या आहेत.यातूनच 'संचालक मंडळाने भ्रष्टाचाराचा व गैरकारभाराचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य आवारात व कार्यक्षेत्रात घाणीचे साम्राज्य, गुंड व गुन्हेगार, हप्तेखोर,चोर, तोतया व डमी व्यापाऱ्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. याची प्रचिती बाजार समितीशी दैनंदिन संबंधीत लोकांना येत आहे. मात्र बाजार समिती व पोलिस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. कारण यामागे अर्थपूर्ण हितसंबंध हे एकच कारण आहे.
याबाबत आम्ही गेल्या काही दिवसांपासून विविध शेतकरी, विविध व्यापारी व अन्य घटकांशी सातत्याने चर्चा करुन वेगवेगळी माहिती गोळा केली आणि या माहितीच्या आधारे दि. २४ जून ला पणन संचालक व पणनमंत्री यांच्याकडे लेखी तकार दाखल केली आहे. याशिवाय आम्ही शेतकरी व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांना भेटून त्यांना सविस्तर माहिती दिली आहे. याप्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे लवांडे यांनी यावेळी सांगितले.
विकास लवांडे म्हणाले,
- पणन संचालकांकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश जगताप यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली.
- चौकशी समितीने बाजार समितीच्या संचालक मंडळाशी असलेले दैनंदिन संबंध बाजूला ठेवून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली पाहिजे.
- मुख्य बाजारातील काही आडतदार हे संचालक मंडळांना हाताशी धरुन आपल्या दप्तरात वजनमापे व बाजार भावाच्यामनमानी पध्दतीने नोंदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत.
- या बनावट नोंदींच्या आधारे बाजार समितीचा सेस बुडवतात. शेतकरी व बाजार समिती यांना वेगवेगळया पध्दतीच्या पावत्या दिल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक व लुट होत आहे.
- बाजार समितीने बेकायदेशीपणे जी -५५ मधील जागा ही कोणतीही मंजुरी नसतांना साध्या ठरावाद्वारे व्यापाऱ्यांना दरमहा दोन ते तीन हजार रुपये भाडे दाखवून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून दरमहा प्रत्येकी ७० ते ८० हजार रुपये घेतले जात आहेत.
- बाजार समितीच्या आवारातील पार्किंगचे टेंडर अजित पवार यांच्याच कार्यकर्त्यांला देण्यात आले आहे.
- सिक्युरिटी गार्डसाठी काही वेगवेगळ्या कंपन्या नियुक्त आहेत. त्यांच्या नावावर प्रत्येकी १०० ते १५० गार्ड दाखवून त्यांचे पगार काढले जात असून प्रत्यक्षात मात्र ४० ते ५० गार्डच कार्यरत असतात. यात सुध्दा अजित पवार यांचाच कार्यकर्ता प्रमुख आहे.
