Veteran socialist thinker Dr. Kumar Saptarshi passes away : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि 'युक्रांद'चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन!
वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : महाराष्ट्राने आणखी एक समाजवादी विचारवंत गमावला
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ जुलै २०२६ :- महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि 'युवक क्रांती दल' चे(युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी (दि.१८ जुलै) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणखी एक समाजवादी विचारवंत गमावला आहे. यामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
दिवंगत डॉ. कुमार सप्तर्षी पेशाने डॉक्टर होते. परंतू, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळी, मानवाधिकार आणि युवक संघटन यासाठी वेचले आहे. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. कुमार गणेश सप्तर्षी असे होते . परंतू, ते डॉ. कुमार सप्तर्षी या नावानेच ओळखले जात असत. त्यांचा जन्म दि. २१ ऑगस्ट १९४१ रोजी झाला. त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून (एस.पी. कॉलेज) विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी. एस. ही पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर विधी शाखेला त्यांनी प्रवेश घेतला होता. परंतू, ही पदवी ते पूर्ण करु शकले नाहीत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक चळवळीत काम करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पूर्णवेळ सामाजीक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. सन १९६७ मध्ये त्यांनी पुणे येथे युवक क्रांती दल (युक्रांद) या पुरोगामी संघटनेची स्थापना केली. या चळवळीने राज्यातील अनेक तरुणांना एकत्र आणून सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली. ते गांधीवादी विचारसरणीचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी सामाजिक विषमता, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात सातत्याने आवाज उठवला. सामाजिक चळवळीत असतानाच त्यांनी दि. ९ ऑगस्ट १९७७ रोजी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षाच्या उमेदवारीवर त्यांची १९७८ साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली होती.
दिवंगत डॉ. कुमार सप्तर्षी यांची एक अभ्यासू वक्ते आणि लेखक म्हणून ओळख होती. त्यांनी समाजवादी विचारधारेवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. याशिवाय विविध आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमुळे त्यांना एकूण ३५ वेळा अटक झालेली आहे.
दरम्यान, त्यांनी सन १९६७ मध्ये दिवंगत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम ता. नवादा जि. गया येथे दुष्काळग्रस्तांसाठी मदतकेंद्र चालवले. कोयना भुकंपग्रस्तांसाठी मदतकार्य केले. दि. १० मे ते १५ मे १९६८ या कालावधीत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात दीड हजार तरुणांची पंधरा दिवसांची ‘श्रम संस्कार छावणी’ संघटीत केली. आणीबाणीच्या काळात पहिले ३ महिने भुमीगत कार्य, दि. २ ऑक्टोबर १९७५ पासुन २६ जानेवारी १९७७ पर्यंत येरवडा कारागृहात मिसा कायद्यातील स्थानबद्ध करण्यात आले होते. दि. २६ जानेवारी १९९२ रोजी त्यांनी सत्याग्रही विचारधारा हे मासिक सुरू केले.
