Raising awareness to protect against leopard attacks : मुलांनो, शाळेत एकटे जाऊ नका, रात्री घराबाहेर झोपू नका!

बिबटच्या हल्ल्यापासून बचावासाठी जनजागृती मोहीम : गेल्या ७६ दिवसांत जुन्नर तालुक्यातील ५०० शाळांमध्ये जनजागृतीचा वनरक्षक रमेश खरमाळे यांचा अनोखा विक्रम 

Raising awareness to protect against leopard attacks : मुलांनो, शाळेत एकटे जाऊ नका, रात्री घराबाहेर झोपू नका!

दत्ता म्हसकर : ग्रामराज्य वृत्तसेवा 

जुन्नर,दि.१७ डिसेंबर २०२५ :- राज्यात ऊसतोडणी हंगाम सुरू झाला आहे. यामुळे आतापर्यंत ऊसाच्या शेतात लपून बसलेले बिबट मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. परिणामी नागरिक आणि गुरा-ढोरांवरील बिबट्याचे हल्ले मोठे प्रमाणात वाढले आहेत. याचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नागरिकांना बसू लागला आहे. या हल्ल्यांपासून शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःबरोबरच आपापल्या पाळीव प्राण्यांचा बचाव कसा करावा, याबाबत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नरचे वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यानुसार खरमाळे हे विद्यार्थ्यांना शाळेत एकटे जाऊ नका,  रात्री घराबाहेर झोपू नका असा सल्ला देत आहेत. 

यानुसार परकाळे यांनी गेल्या ७६ दिवसांत जुन्नर तालुक्यातील पाचशे शाळांमध्ये बिबट जनजागृतीचा अनोखा विक्रम केला आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट व मानवातील संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट हल्ल्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत परकाळे यांनी ही जनजागृती सुरू केली आहे. 

ही जनजागृती मोहीम त्यांनी दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी केली. ही मोहीम सुरू झाल्यापासून दि. १६ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या या ७६ दिवसांच्या कालावधीत खरमाळे ५०० शाळांमध्ये जनजागृती केली आहे. यासाठी ते सकाळच्या कुडकुडणाऱ्या थंडीत मोटार सायकलवरून प्रवास करत डोंगर-दऱ्यातील शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना पर्यावरण तसेच बिबट स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करत आहेत‌. 

सामाजिक वनीकरण विभाग आणि जुन्नर पंचायत समितीच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण जुन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक तापमानवाढ आणि वनांचा ऱ्हास थांबण्यासाठी खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांना पशु-पक्षी व पर्यावरण यांचे महत्त्व, विविध पक्षी व प्राणी यांच्या उदाहरणासह पटवून देत ते  मुलांनी बिबट्या पासून कशी काळजी घ्यावी, याची माहिती देत आहेत.

यानुसार खरमाळे हे मुलांना, शाळेतून एकटे घरी का जाऊ नये ?, सर्व विद्यार्थ्यांनी समुहानेच घरी परत का जावे ?, अंधारात बाहेर का फिरू नये?, रात्री बाहेर का झोपू नये ?, स्वच्छतागृहाचा  वापर का करावा?, पिंजऱ्याजवळ का जाऊ नये?, बिबट्याच्या पिल्लांना हात का लावू नये?, घर व परीसर स्वच्छ का ठेवावा?,  शाळेला सुट्टी असल्यावर घरी कसे रहावे?, याबाबतचे सखोल मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय समोरून बिबट्या आला तर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, चिकन-मटण खाल्ले तर, त्याची हाडे कोठे टाकावीत, शेतात काम कसे करावे, जनावरे कोठे व कशी बांधावीत, याबाबत अगदी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत व सहज प्रभाव पडेल अशा पद्धतीने सल्ले देत आहेत. 

जुन्नर तालुक्यातील कोणत्याही मुलावर बिबट हल्ला होऊ नये म्हणून दक्षता घेतली जावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. बिबट जागृतीमुळे  हल्ले थांबण्यास मदत होईल. 

- रमेश खरमाळे, वनरक्षक, जुन्नर.