प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींच्या विरोधात गुरुवारी पुण्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देणार : काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २ एप्रिल २०२५ :- राज्य सरकारचे प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयक हे प्रसारमाध्यमे आणि पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. शिवाय या विधेयकातील तरतुदी या माध्यमांची गळचेपी करणाऱ्या आहेत. त्यामुळे जनसुरक्षा विधेयकाच्या तरतुदींच्या विरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने येत्या गुरुवारी (दि.३ एप्रिल) पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात येणार आहे. शिवाय सर्व पत्रकार काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
राज्य सरकारने त्वरित या विधेयकातील जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मिनाक्षी गुरव यांनी केली आहे.
या मागणीसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने येत्या गुरुवारी (दि.३) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना या विशेष विधेयकांनी तरतुदींच्या निषेधार्थ निवेदन देण्यात येईल. तसेच यावेळी काळ्या फिती लावण्यात येतील. तरी, सर्व सदस्यांनी निषेध नोंदविण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही अध्यक्ष सुनीत भावे यांनी केले आहे.