Pune Zilla Parishad Ward Committees : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व गटांमध्ये प्रभाग समित्यांची स्थापना करणार!
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची माहिती : दर तीन महिन्यांतून बैठक होणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये पुन्हा एकदा प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या सर्व प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी संबंधित जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांची निवड केली असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
या प्रभाग समित्यांच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी संबंधित प्रभागातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. यामुळे गावा-गावांमध्ये सुरू असलेली विकासकामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
याआधी म्हणजेच सन २०१७-२२ या पाच वर्षांच्या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गट निहाय प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली होती. परंतू, आता याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे आता राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमध्ये अशा प्रभाग समित्या स्थापन होऊ शकणार नाहीत. मात्र राज्य सरकारने याबाबतचा निर्णय रद्द केला असला तरी पुणे जिल्हा परिषदेच्या पातळीवर या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यात ७३ प्रभाग समित्या स्थापन होणार
या प्रभाग समित्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आपापल्या प्रभागातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींचा समावेश केला जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे एकूण ७३ गट आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ७३ प्रभाग समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
