Pune Graduate Election Voter Registration : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ऑनलाइन मतदार नोंदणीला शेवटच्या दिवशी 'ब्रेक'! 

नवीन मतदार नोंदणी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे नोंदणीच होईना : दिवसभर प्रयत्न करुनही  नोंदणी न झाल्याने अनेक मतदार नोंदणीपासून वंचित

Pune Graduate Election Voter Registration : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ऑनलाइन मतदार नोंदणीला शेवटच्या दिवशी 'ब्रेक'! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ सप्टेंबर २०२६ :-  पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीसाठीचे संकेतस्थळ (पोर्टल) शनिवारी (दि.२६ सप्टेंबर) म्हणजेच मतदार नोंदणीच्या शेवटच्या दिवशी तांत्रिक बिघाडामुळे दिवसभर बंद पडले. यामुळे या दोन्ही मतदारसंघासाठी ऑनलाइन मतदार नोंदणी करणाऱ्यांना पोर्टलवर जाऊन मतदार नोंदणी करणाऱ्यांची अखेर मतदार नोंदणीच पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी या मतदार नोंदणीसाठी दिवसभर प्रयत्न करूनही अनेकांना नोंदणीपासून वंचित रहावे लागले आहे. 

भारत निवडणूक आयोगाने या दोन्ही मतदारसंघाच्या ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी दि. २६ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीपैकी दि. २५ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव मिरवणुकीमुळे अनेकांना मतदार नोंदणी करता आली नाही. त्यामुळे अनेक इच्छुक हे शनिवारी सकाळपासूनच यासाठी प्रयत्न करत होते. परंतू, हे संकेतस्थळावर नवीन मतदार नोंदणीसाठीचे लॉगीनच होत नव्हते. या संकेतस्थळावर जाऊन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ओटीपीचे व्हेरिफिकेशनच होत नव्हते आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच लॉगिन होत असते. मात्र शनिवारी सकाळपासूनच ओटीपी व्हेरिफिकेशन होत नसल्याने अनेक इच्छुकांना मतदार नोंदणी करता आली नसल्याचे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी यावेळी निवडणूक कार्यक्रम, आदर्श आचारसंहिता, मतदार नोंदणी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली होती. 

या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी नव्याने मतदार नोंदणीची संधी २६ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी दि. ७ ऑक्टोबर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दि. ९ ऑक्टोबर आहे. दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, दि. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

'ट्राय आफ्टर समटाईम'ने नवे मतदार झाले 'बेजार'!

 या निवडणुकीसाठी ऑनलाइन नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी  https://mahaelection.gov.in हे संकेतस्थळ देण्यात आले होते. या संकेतस्थळावर जाऊन मतदार नोंदणी करता येईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले होते. परंतू, या संकेतस्थळावर शनिवारी दिवसभर ओटीपी स्विकारला जात नसल्याने आणि त्यावर ट्राय आफ्टर समटाईम हा मेसेज येत नसल्याने नवीन मतदार बेजार झाल्याचे अनेकांनी सांगितले.