Material testing lab demand: पुणे जिल्हा परिषदेत बांधकाम मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू करा! 

हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी 

Material testing lab demand: पुणे जिल्हा परिषदेत बांधकाम मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू करा! 
पुणे:- बांधकाम साहित्य चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्याच्या मागणीचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना देताना हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ ऑक्टोबर २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वतःची स्वतंत्र ‘मटेरियल टेस्टिंग लॅब’ उभारावी, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केली आहे. या मागणीसाठीचे पत्र काकडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना दिले आहे‌. स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्याच्या या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने त्वरित मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेमार्फत सध्या विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या कामांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि  बांधकामामध्ये वापरल्या जाणाऱ्या मटेरियलची (साहित्याची) गुणवत्ता वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. कारण काही ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा संशय आहे. अशा प्रकारच्या निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेची स्वत:ची सक्षम चाचणी यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक असल्याचे काकडे यांनी या पत्रात नमूद केले आहे. 

सध्या पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याच्या (मटेरियल) चाचण्या करण्यासाठी कंत्राटदारांना बाहेरील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते. यापैकी काही प्रकारच्या चाचण्या एकाच प्रयोगशाळेत उपलब्ध नसल्याने कंत्राटदारांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वेळ आणि प्रक्रियेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत  असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने स्वतःची स्वतंत्र मटेरियल टेस्टिंग लॅब उभारल्यास विविध विकासकामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासणे सुलभ होईल. तसेच कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यास आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर रोखण्यास मदत होईल, असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशने याआधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही मागणी केलेली आहे.

पुणे जिल्हा परिषदेने स्वतःची स्वतंत्र मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी उभारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. कारण सध्या याच चाचण्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लॅबमध्ये घेतल्या जात असल्याने चाचण्यांसाठीचे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जात आहेत. ते सर्व पैसे या लॅबोरेटरीमुळे पुणे जिल्हा परिषदेला मिळतील. तसेच काही बेरोजगार तरुणांना रोजगारही उपलब्ध होण्यास मदत होईल. 

 - युवराज काकडे, 
सभापती, पंचायत समिती, 
हवेली.